मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. रविवारी रात्री हा प्रकार घडला असून नेहरु नगर पोलीसस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
रजनी कुडाळकर यांनी रात्री 9 वाजल्याच्या दरम्यान आत्महत्या केल्याचं कळतंय. पोलिसांनी रजनी यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. हा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेहरु नगर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितंल की, ‘सध्या प्राथमिक माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, यामागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.’
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी मंगेश कुडाळकर यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. रजनी कुडाळकर यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण जरी अद्याप समजू शकलेलं नसलं तरी सध्या अशी चर्चा आहे की, कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी. याशिवाय काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाचंही अचानक निधन झालं होतं. त्यामुळे रजनी कुडाळकर यांना मोठा धक्का बसला होता.
मंगेश कुडाळकरांना सेक्सटॉर्शनमध्ये अडकविण्याचा करण्यात आला होता प्रयत्न
मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभेचे आमदार आहेत. ते तिथे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांना एका सेक्सटॉर्शन केसमध्ये देखील अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
मंगेश कुडाळकर यांना 20 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री एक मेसेज आला होता. हा मेसेज मौसमदीन नावाच्या एका व्यक्तीने केला होता. चॅटिंगमध्ये आपण महिला असल्याचं भासवून त्याने आमदार कुडाळकर यांच्याकडे मदत मागितली होती.
आमदार कुडाळकर देखील मदतीसाठी तयार झाले होते. त्यानंतर थोड्याच वेळाने आमदार कुडाळकरांच्या मोबाइलवर एका महिलेचा व्हीडिओ कॉल आला.
या महिलेने कुडाळकरांशी साधारण 15 सेकंद बातचीत केली आणि त्यांच्याकडे मदत मागितली. दरम्यान, हा कॉल कट झाल्यानंतर काही वेळाने कुडाळकरांच्या मोबाइलवर याच नंबरवरुन एक व्हीडिओ पाठविण्यात आला.
जो एडिट करण्यात आला होता. हा व्हीडिओ पाठवून आरोपीने आमदार कुडाळकर यांच्याकडे तात्काळ 5 हजार रुपयांची मागणी केली होती. कुडाळकर यांनी देखील फोन-पे वरुन आरोपीला 5 हजार रुपये दिले होते.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी एका वेगळ्याच नंबरवरुन मंगेश कुडाळकर यांना फोन आला. त्यावेळी आरोपीने पुन्हा एकदा अश्लील व्हीडिओच्या नावाखाली ब्लॅकमेल त्यांच्याकडे 11 हजार रुपयांची मागणी केली.
त्यानंतर मात्र आमदार कुडाळकर यांनी पोलीस ठाण्यात सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याची तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली होती.
ADVERTISEMENT