भाजपचे नेते उठसुट तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देतात, तुरुंगाचे खासगीकरण झालं आहे का?-संजय राऊत

मुंबई तक

• 02:24 AM • 07 Nov 2021

महाराष्ट्रातले भाजपचे नेते महागाईवर बोलत नाहीत. पेट्रोल पाच रूपयांनी कमी झालं आहे म्हणून बागडत आहेत. पण पाच रूपये कमी करूनही पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडलेलीच आहे. एवढंच नाही तर भाजपचे नेते रोज सकाळी उठून याला तुरूंगात टाकणार, त्याला तुरुंगात टाकणार असे धमकावत असतात. देशातल्या सरकारी कंपन्या तर केंद्राने विकल्या, अनेक उपक्रमांचं खासगीकरण केलं. तसंच आता […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रातले भाजपचे नेते महागाईवर बोलत नाहीत. पेट्रोल पाच रूपयांनी कमी झालं आहे म्हणून बागडत आहेत. पण पाच रूपये कमी करूनही पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडलेलीच आहे. एवढंच नाही तर भाजपचे नेते रोज सकाळी उठून याला तुरूंगात टाकणार, त्याला तुरुंगात टाकणार असे धमकावत असतात. देशातल्या सरकारी कंपन्या तर केंद्राने विकल्या, अनेक उपक्रमांचं खासगीकरण केलं. तसंच आता तुरुंगाचं खासगीकरण झालं आहे का? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून विचारला आहे.

हे वाचलं का?

काय म्हणालेत संजय राऊत?

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असे आव्हान दिलं. तर दिवाळी संपण्याची वाट कशाला बघता आत्ताच बॉम्ब फोडा असं प्रतिआव्हान मलिक यांनी दिलं. दिवाळी संपली तरीही आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटतच राहतील. भाजपला कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचं सरकार घालवायचं आहे. सरकार घालवण्याची ही अलोकशाही पद्धत कोणती?

बुधवारी सकाळी नागपूरमधून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा फोन आला होता. आठ दिवसात सरकार पाडू असं भाजपवराले बोलत असल्याचं लोंढे यांनी सांगितलं. सरकार पाडू आणि सरकार पडेल याच कैचीत विरोधी पक्ष अडकून पडला आहे. सरकार बहुमतावर आधारीत असते, ते बहुमत गोळा करण्याची जबाबदारी बहुदा केंद्रीय तपास यंत्रणावर आलेली दिसते. त्यातलीच एक यंत्रणा म्हणजे NCB.

Aryan Khan प्रकरणात समीर वानखेडेंचे चौकशीचे अधिकार काढले, नवाब मलिक म्हणतात…

NCB चा खरा चेहरा नवाब मलिक यांनी उघड केला. केंद्रीय यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करतात. त्या भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतात हे मलिक यांनी पुराव्यांसह समोर आणलं आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रातील आणखी काही मंत्र्यांना तुरुंगात पाठवू अशी वाचाळकी भाजपचे लोक रोज करत आहेत. मंत्र्यांची नावं घेऊन वायफळ बडबड करत आहेत. तुरुंगात पाठवणार म्हणजे ते काय करणार? राज्याचे माजी गृहमंत्री ईडीच्या कोठडीत आहेत. परमबीर सिंग या पोलीस अधिकाऱ्याने हवेत आरोपांचे बार उडवले आणि अदृश्य झाले. त्या अदृश्य आरोपांवर भाजपने गोंधळ घातला. आता परमबीर महाशयाचं एक प्रतिपादन समोर आलंय. ज्यामध्ये ते म्हणतात अनिल देशमुखांविरोधात पुरावे नाहीत. आरोप करणारा पळूनच गेला नाही तर त्याने आरोपही नाकारले.

असं असूनही अनिल देशमुखांची यथेच्छ बदनामी करण्यात आली. त्यांना तुरुंगात जावं लागलं. कोणत्याही ठोस पुरव्यांशिवाय अनिल देशमुख तुरुंगात आहेत. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही तरीही त्याला 25 दिवस तुरुंगात रहावं लागलं. भाजपची मनमानी, मस्तवालपणा आणि विकृत तानाशाही यातून दिसते. राज्याचा गळा दाबण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार राजकारण करत आहे ते लोकशाही, संविधानाची हत्या करणारेच आहे. आता मला प्रश्न पडला आहे की तुरुंगांचंही खासगीकरण झालं आहे का? असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला फटकारलं आहे.

    follow whatsapp