शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. परंतू अवघ्या काही वर्षांतच या पक्षांमधले मतभेद आता प्रामुख्याने समोर यायला लागले आहेत. यावेळी निमीत्त ठरलंय, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधल्या पंचायत समितीचं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहीते-पाटील यांना आव्हान देत सत्ता आहे म्हणून माज करु नका अशा शब्दांत सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
काय आहे वादाचं नेमकं कारण?
खेड पंचायत समितीत शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात सर्वपक्षीय १४ पैकी ११ जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल झाला होता. खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता असून त्यांचे ८ सदस्य निवडून आलेत. राष्ट्रवादीचे या समितीत ४ सदस्य असून काँग्रेस आणि भाजपचा १-१ सदस्य आहे. या पंचायत समितीत सभापतीपद हे सर्वसाधारण वर्गासाठी आहे. परंतू भगवान पोखरकर यांच्याविरोधात बंड पुकारण्यात आलं.
परंतू सभापतीपदाचा कालावधी संपायला ९ महिने बाकी असताना शिवसेनेत अंतर्गत बंडाळ्या सुरु झाल्या आहेत. सभापती-उप सभापती निवडणुकीवरुन मतभेद समोर येत असून शिवसेना सदस्या सुनीता सांडभोर यांनी पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून राष्ट्रवादीच्या ४ सदस्यांचा याला पाठींबा आहे. आमदार दिलीप मोहीते यांचा बंडखोरीमागे हात असल्याची चर्चा खेडमध्ये सुरु आहे.
अविश्वास ठराव मंजूर, सदस्य सहलीवर…खेडमध्ये घडामोडींना वेग –
शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर खेड पंचायत समितीच्या नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलेले सर्व सदस्य सहलीवर गेले आहेत. यापाठीमागे दिलीप मोहीतेंचा हात असल्याचं म्हणत शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी नुकताच खेडचा दौरा केला. यावेळी बोलत असताना राऊत यांनी दिलीप मोहीतेंना माज आलाय असं म्हणत त्यांच्यावर टीका केली. “थोडीफार सत्ता आहे म्हणून माजू नका. शिवसेना उत्तर देईल, पंचायत समिती सदस्यांना दहशतीने पळवून नेण्यात आलं. हे घाणेरडं राजकारण आहे, त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत ही बाब पोहचवली जाईल”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
बाळासाहेबांप्रमाणे आमची पवारांवरही श्रद्धा आहे. सुरुवातीला आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि मग निर्णय घेऊ. पण मोहिते यांची वागणूक अशीच असेल तर पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो किंवा नसो, खेडमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून येईल आणि सध्याचे आमदार माजी आमदार होतील. अजित पवारांनी या प्रकरणात लक्ष घालावं आणि त्यांना जमत नसेल तर हा विषय शिवसेनेकडे सोपवावा. आम्ही काय करायचं ते पाहू घेऊ असं म्हणज राऊतांनी राष्ट्रवादी आमदार दिलीप मोहितेंवर हल्ला चढवला आहे.
दिलीप मोहिते पाटलांचा वारु हा नेहमीच उधळलेला असतो. पण आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्ही काय करु शकतो हे खेडमध्ये दाखवून देऊ असं म्हणज संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT