मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला परवानगी दिली. यावेळी न्यायालयाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिकाही फेटाळून लावली. यानंतर ठाकरे गटाकडून मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध भागात सेलिब्रेशन करण्यात येत आहे. या दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना “तयारीला लागा, गर्दीचा रेकॉर्ड मोडणारा मेळावा घेऊ” असा आदेश दिला.
ADVERTISEMENT
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी नाशिक, त्र्यंबकेश्वरमधील पदाधिकारी, शिवसैनिक मातोश्रीवर आले होते. यावेळी त्यांनी या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना काही सुचना दिल्या. तसेच महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश दिला, पण निवडणुकीच्या तोंडावर रुसवे, फुगवे होऊ देऊ नका आणि गट पडू देऊ नका असा सल्लाही दिला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उत्साह अमाप आहे, पण एकजुटही ठेवा. आपल्याला प्रत्येक महापालिका जिंकायचीच आहे, शिवसेनेचा भगवा फडकावयचाच आहे. निवडणूक आल्यावर रुसवे, फुगवे, गट पडणे अशा गोष्टी होऊ देऊ नका. उमेदवारी फार मोजक्या लोकांना देता येते. पण आपल्यासाठी भगवा झेंडा हाच आपला उमेदवार आहे. मी लवकरच नाशिकला येणार आहे. त्यामुळे तयारीला लागा. गर्दीचा रेकॉर्ड मोडणारा मेळावा घेऊ.
ठाकरे गटाला दसरा मेळाव्याची परवानगी :
मुंबई महापालिकेनं शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर ठाकरे गटाकडून हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेनं महापालिकेच्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या याचिकेला विरोध करणारी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज शिवसेना, शिंदे गट आणि मुंबई महापालिका अशा तिन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत कोर्टाने ठाकरे गटाला परवानगी दिली
ADVERTISEMENT