डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला (Ram Rahim) सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या इतर चार आरोपींनाही न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेसह दंडाची शिक्षा सुनावली आहे. रंजित सिंह यांच्या हत्येप्रकरणी पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
ADVERTISEMENT
डेरा सच्चा सौदाचे व्यवस्थापक रंजित सिंह यांची 2002 मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गुरमीत राम रहीमसह इतर तिघांवर आरोप करण्यात आले होते. सीबीआय न्यायालयाने 8 ऑक्टोबर रोजी राम रहीमसह पाचही आरोपींना हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवलं होतं. न्यायालय निकाल देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पंचकुलातील सुरक्षा वाढवण्यात आली होती. जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आलं.
रंजित सिंह हत्या प्रकरणी मागील सुनावणी वेळी सीबीआयने डेरा सच्चा प्रमुख राम रहीमला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजर असलेल्या राम रहीमने माफी देण्याची मागणी केली होती. राम रहीमने शारीरिक व्याधींचं कारण देत शिक्षेतून माफी देण्याची मागणी केली होती.
या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने निकाल दिला. यात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला जन्मठेप आणि 31 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर या घटनेतील इतर चार आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी 50 लाख रुपयांची शिक्षा ठोठावली आहे.
जुलै 2002 मध्ये करण्यात आली रंजित सिंहची हत्या
रंजित सिंह यांची जुलै 2002 मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. विशेष सीबीआय न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. सीबीआयने 2003 मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. घटनेला 19 वर्ष लोटल्यानंतर 12 ऑगस्ट 2021 रोजी प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर ऑक्टोबरच्या सुरूवातीला न्यायालयाने राम रहीमसह पाचही आरोपींना दोषी ठरवलं होतं.
बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगतोय राम रहीम
सध्या राम रहीम तुरुंगात असून, त्याला आश्रमातील दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. राम रहीमला 20 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली आहे. त्याचबरोबर पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणातही जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे. राम रहीम रोहतकमधील सुनारिया तुरुंगात सध्या शिक्षा भोगत आहे.
ADVERTISEMENT