MPSC ची १४ मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने ठाकरे सरकारविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या निर्णयाचा फेरविचार केला जावा अशी मागणी काँग्रेसमधून होते आहे. काही वेळापूर्वीच मदन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी MPSC बाबतचा निर्णय हा मला अंधारात ठेवून घेतला गेला असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र पुण्यात या निर्णयाचे पडसाद जसे उमटले तसे राज्यभरातही या निर्णयाचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले.
ADVERTISEMENT
औरंगाबाद
औरंगाबाद मध्ये MPSC च्या निर्णयावरून चिडलेल्या विद्यार्थ्यांनी १४ मार्चला परीक्षा झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी केली. त्यासाठी हे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते. औरंगाबाद येथील जोतिबा फुले चौकातही ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
हिंगोली
ऐन दोन दिवसावर आलेली MPSC परीक्षा अचानक शासनाने, परिपत्रक काढून रद्द केल्याने,अनेक MPSC वर्षा पासून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत हिंगोली शहरातील आदर्श कॉलेज परिसरात रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करत शासनाच्या निर्णयाचा निषेध केला,
यवतमाळ
यवतमाळमध्येही विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले पाहण्यास मिळाले. यवतमाळमधल्या विद्यार्थ्यांनीही सरकारविरोधात घोषणाबाजी करून या निर्णयाचा निषेध नोंदवला. १४ मार्चच्या परीक्षेसाठी आम्ही तयारी केली होती आणि सरकारने अचानक असा निर्णय कसा काय घेतला? असा प्रश्न विचारत विद्यार्थी आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले.
अमरावती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द केल्याने अमरावती शहरातल्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. तसंच सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. विद्यार्थी इतके आक्रमक झाले होते की त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
MPSC ची तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थी रस्त्यावर
बारमतीतही आंदोलन
१४ मार्चला होणारी MPSC ची पूर्व परीक्षा रद्द झाल्याने बारामतीतले विद्यार्थीही रस्त्यावर उतरले. बारामती शहरात सरकारविरोधी घोषणाबाजी आज करण्यात आली. भाजपचे नेते नाना सातव आणि अभिजित देवकाते यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन झालं.
बीडमध्येही विद्यार्थी आक्रमक
MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने बीडमधल्या विद्यार्थ्यांनीही ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी केली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर या सगळ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. हा निर्णय मागे घ्या नाहीत आंदोलन आणखी तीव्र करू असाही इशारा यावेळी या विद्यार्थ्यांनी दिला.
सांगलीत रास्ता रोको
MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने सांगलीत विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारूनही आंदोलन केलं. परीक्षा आमच्या हक्काची असे नारेही यावेळी देण्यात आले.
अकोला
MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने अकोल्यातही सरकारविरोधात घोषणाबाजी झाली. आम्हाला कोरोना प्रतिबंधाचे निर्णय समजतात आमची परीक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली.
नांदेड
MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने नांदेडमध्येही विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग होता.
ADVERTISEMENT