एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी झाले. दोन्ही पक्षातील 18 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात शिंदे गटाकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागली आहे. शिक्षण, कारखानदारीसह सावंतांनी राजकारणात देखील आपली छाप सोडली आहे. एकनाथ शिंदेंसोबत बंड करत तानाजी सावंत उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते. अखेर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात देखील मंत्रिपद आले आहे.
ADVERTISEMENT
कोण आहेत तानाजी सावंत?
तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव या गावात त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सावंत यांनी शिक्षण क्षेत्रासह, राजकारण आणि कारखानदारीत आपली ठसा उमटवला. पुण्यात त्यांनी जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी करीत त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले. सध्या भैरवनाथ शुगर कारखान्याचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पाच युनिट कार्यान्वित आहेत.
तानाजी सावंतांची राजकीय कारकीर्द
तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपल्या राजकीय प्रवासाला सुरवात केली होती. 2015 साली त्यांनी राष्ट्रवादी सोडून सेनेत प्रवेश केला. 2016 साली त्यांना शिवसेना उपनेतेपद देण्यात आले. त्याच साली ते यवतमाळ विधानपरिषदेतून निवडून येत पहिल्यांदा आमदार झाले. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. त्यादरम्यान ते मातोश्रीच्या अगदी जवळचे मानले जायचे.
मातोश्रीमध्ये तानाजी सावंत यांच्या शब्दाला किंमत होती, असं बोललं जातं.त्याचंच फलित म्हणून फडणवीस सरकारच्या काळात पहिल्यांदा मंत्रीपदी ते विराजमान झाले. जलसंधारण खातं त्यांना देण्यात आलं होतं. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा मतदारसंघातून निवडणूक लढवली. सलग तीन वेळेस निवडून आलेले आणि चौथ्यांदा आपलं नशीब अजमावत असलेले राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांचा त्यांनी पराभव केला.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने होते नाराज
राहुल मोटे यांचा पराभव करत त्यांनी विधानसभेत एंट्री केली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात सरकार स्थापन केले. त्यादरम्यान सावंत यांच्याकडे शिवसेनेतील महत्वाचे नेते म्हणून पहिले जायचे. त्यामुळे मंत्रीपदी त्यांची वर्णी लागेल असं सर्वांना वाटतं होतं. मात्र, तसं झालं नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद त्यांना मिळालं नाही. त्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे ते कधीही भाजपमध्ये जातील, अशी चर्चा जोर धरत होती. मात्र, शिंदेंनी केलेल्या बंडात ते सामील झाले आणि मंत्रीपदी विराजमान झाले.
ADVERTISEMENT