मुंबईकरांसाठी लोकल ही जशी रक्तवाहिनीसारखी आहे तसाच रिक्षा आणि टॅक्सीचा पर्यायही. अनेकदा अनेक नोकरदार हे रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करून ऑफिस गाठत असतात. मीटर रिक्षा, मीटर टॅक्सी किंवा शेअर रिक्षा, शेअर टॅक्सी हे पर्याय त्यांच्यासमोर असतात. मात्र आता मुंबईकरांचा हाच रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महाग होणार आहे. कारण १ ऑक्टोबरपासून मुंबईत रिक्षा, टॅक्सीच्या दरांमध्ये वाढ होणार आहे.
ADVERTISEMENT
संप टळला पण दरवाढ झाली
सीएनजीच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता खटुआ समितीच्या शिफारसीनुसार भाडेवाढ मिळावी या मागणीसाठी मुंबईतले रिक्षा आणि टॅक्सीचालक २६ सप्टेंबरपासून म्हणजेच सोमवारपासून बेमुदत संपावर जाणार होते. मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय झाला. मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने ही बाब स्पष्ट केली. असं असलं तरीही रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ मात्र टळलेली नाही.
किती वाढले रिक्षा आणि टॅक्सीचे दर?
पुढच्या आठवड्या एमएमआरटीएच्या बैठकीत भाडेवाढीवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ज्यानंतर टॅक्सीच्या भाड्यात तीन रूपये तर रिक्षा भाड्यात दोन रूपये अशी वाढ केली जाईल. १ ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू करण्यात येईल असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
या दरवाढीनंतर टॅक्सी आणि रिक्षाचं किमान भाडं वाढणार
१ ऑक्टोबरपासून जी दरवाढ होणार आहे त्यानंतर टॅक्सीचं किमान भाडं २५ वरून २८ रूपये होणार आहे तर रिक्षाचं किमान भाडं २१ वरून २३ रूपये होणार आहे. सोमवारी या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होईल असंही समजतं आहे. रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली. त्यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, वाहतूक पोलीस सह आयुक्त राजवर्धन यांचीही उपस्थिती होती.
मागील काही महिन्यांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे सीएनजी गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात सीएनजी गॅसच्या दरात कपात केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ केली. सध्या सीएनजी गॅसचा दर 80 रुपयांच्या घरात पोहचला आहे. राज्यातील बहुतांशी रिक्षा-टॅक्सी या सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसत होता. त्याशिवाय वाढत्या महागाईच्या काळात आर्थिक गणित जमवणे रिक्षा-टॅक्सी चालकांना कठीण होत आहे, ज्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालक संपावर जाणार होते. आता संप टळला असला तरीही भाडेवाढ मात्र होणार आहे.
ADVERTISEMENT