मुंबई: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS)मुंबईतील वांद्रे परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहम्मद इरफान रहमत अली शेख असे या दहशतवाद्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी अटक केलेले दोन संशयित दहशतवादी यांच्याशी इरफान संबंधित होता असे सांगितले जात आहे. हे सर्व जण देशात मोठे घातपाती हल्ल्याचे कारस्थान रचत होते.
ADVERTISEMENT
एएनआय वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज (30 सप्टेंबर) मुंबई एटीएसने गुप्त माहितीच्या आधारे एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. अटक करण्यात आलेला दहशतवादी इरफानला मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला 4 ऑक्टोबरपर्यंत एटीएस रिमांड मिळाला आहे.
एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हे सर्व दहशतवादी देशात बॉम्बस्फोटाची योजना आखत होते. यावेळी अटक करण्यात आलेल्या इरफानकडून मोबाईल फोन आणि काही संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तान समर्थित दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित इरफानला अटक करण्यात आली आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफानकडून अनेक महत्त्वाची माहिती मिळू शकते.
अटक केलेल्या संशयिताचे नाव इरफान रहमत अली शेख असे आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. तो मुंबईच्या वांद्रे परिसरात असलेल्या खेरवाडीचा रहिवासी आहे आणि व्यवसायाने तो टेलर आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतलेल्या झाकीर हुसेन शेख आणि रिझवान मोमीन यांच्या चौकशीदरम्यान इरफान रहमतचे नाव समोर आले होते.
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने देशाच्या विविध भागांमध्ये हल्ले करण्याची योजना आखणाऱ्या सहा संशयितांना अटक केल्यानंतर आणि दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने त्यांच्याविरुद्ध यूएपीए (UAPA) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, महाराष्ट्र ATS ने या महिन्याच्या सुरुवातीला या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. या अंतर्गत ही तिसरी अटक आहे. UAPA कलम 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दिल्ली पोलिसांनी गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतर देशाच्या विविध भागातून सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. या माहितीनंतर सर्व राज्यांच्या एटीएस यंत्रणा सतर्क झाल्या.
कुणी MBA तर कुणी शेतकरी, जाणून घ्या कोण आहेत दिल्ली पोलिसांनी अटक केलेले सहा संशयित दहशतवादी?
संशयित दहशतवादी जान मोहम्मदही एटीएसच्या ताब्यात
धारावीतील जान मोहम्मद शेखला अटक करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने दिल्ली पोलिसांसोबत माहितीची देवाण-घेवाण केली होती. त्यानंतर एटीएसने कारवाई सुरू केली आणि संशयित जान मोहम्मद शेखनंतर आणखी दोघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली होती.
एटीएस प्रमुखांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ‘जान मोहम्मदची आर्थिक परिस्थिती बिकट होती. पूर्वी तो मुंबईत टॅक्सी चालवायचा. सुरुवातीला तो नोकरी करायचा पण नोकरी गेल्यानंतर त्याने कर्ज काढून स्वतःची टॅक्सी घेतली होती. मात्र, कर्जाची परतफेड करू शकला नाही. हफ्ते न भरल्याने बँकेनं त्याची गाडी ओढून नेली होती. त्यानंतर त्याने मोटारसायकलही घेतली होती. तो झोपडपट्टीत राहायचा. एकूणच त्याची परिस्थिती हलाखीची होती. त्यातच तो डी-गँगच्या संपर्कात आला होता.’
दरम्यान, धारावी, मुंब्रा आणि आता वांद्रे येथून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे घातपाती कटाचं जाळं किती मोठं आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT