काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हैदोस घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात असून, शनिवारी पुन्हा एकदा दोन परप्रांतीय नागरिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पुलवामा आणि श्रीनगरमध्ये या घटना घडल्या आहेत.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून सामान्य माणसांना निशाणा बनलवं जात आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानंतर लष्कराने दहशतवादविरोधी मोहिमेला गती दिली असून, दहशतवाद्यांसोबत चकमकीही झडल्या आहेत.
दुसरीकडे दहशतवाद्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जाण्याच्या घटना सुरूच आहेत. काश्मीर परिक्षेत्राच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी परप्रांतीय नागरिकांची हत्या केली आहे.
श्रीनगरमधील ईदगाह परिसरात शनिवारी सायंकाळी 6.40 वाजता अरविंद कुमार या पाणीपुरी विक्रेत्यावर हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 36 वर्षीय अरविंद कुमार यांचा मृत्यू झाला.
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा हैदोस! चकमकीत पाच जवान शहीद
दुसऱ्या घटनेत पुलवामात एका उत्तर प्रदेशच्या नागरिकाची हत्या करण्यात आली. मूळच्या उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवाशी असलेल्या आणि पुलवामात कारपेंटर म्हणून काम करणाऱ्या सागीर अहमद यांची हत्या करण्यात आली.
दहशतवाद्यांच्या गोळीबारात अहमद जखमी झाले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या घटनांनंतर लष्कराने पूर्ण परिसराला वेढा दिला असून, सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आलं आहे.
अरविंद कुमार यांच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अरविंद कुमार हे बिहारमधील बांका येथील रहिवाशी असून, तीन महिन्यांपूर्वी ते जम्मू काश्मीरला गेले होते. श्रीनगरमधील इदगाह परिसरात त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत घोषित केली. दरम्यान, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
काश्मीर खोऱ्यात मागील काही दिवसांपासून वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. लष्कर आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीच्या घटना वाढल्या असून, अल्पसंख्याक समुदायामध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. परप्रांतीय नागरिकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे पुन्हा एकदा स्थलांतर होत असल्याचं चित्र काश्मिरात दिसत आहे.
ADVERTISEMENT