विधानसभेत भाजपच्या बारा आमदारांनी केलेलं वर्तन अत्यंत लाजिरवाणं होतं असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस प्रचंड वादळी ठरला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो ठराव मांडला गेला त्यानंतर भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांचा माईक खेचण्याचा प्रयत्न झाला. तसंच सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं तेव्हा त्यांच्या दालनात जाऊनही भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला. या सगळ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता भाष्य केलं आहे. भाजपच्या बारा आमदारांनी जे काही केलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसं नाही. भाजपसारखे आम्ही नाही. दोन दिवसांच्या अधिवेशनात आम्ही लोकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
ADVERTISEMENT
भाजपच्या आमदारांनी केलेलं वर्तन महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसं नाही, अत्यंत लाजिरवाणं आहे. मी जेव्हा पहिल्यांदा विधीमंडळात पाऊल ठेवलं तेव्हा मला या सभागृहाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. हल्ली जे काही राजकारणाच्या नावाखाली चाललं आहे ते पाहिल्यानंतर कामकाजाचा दर्जा उंचवण्याकडे आपला कल आहे की खालावण्याकडे आहे हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर दर्जा खालावत चालला आहे असं वाटतं आहे. जिथे चांगला बदल घडवला जातो त्या विधानसभेत जे दृश्य पाहिलं तेही एका जबाबदार पक्षाकडून ते मान खाली घालायला लावणारं आहे. साधा विषय आहे की ओबीसी आरक्षणावर आम्ही ठराव केला तेव्हा त्यावर तुम्हाला बोलण्याचा, विरोध दर्शवण्याचा पूर्ण अधिकार विरोधी पक्षाला आहे. पण गोंधळ घालायचा, राडा करायचा, माईक खेचायचा हे सगळे प्रकार घडलेले पाहिले आणि लाज आणणारं हे कृत्य आहे हेच जाणवलं. रस्त्यावर या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर काहीही बोललो नसतो. मात्र सभागृहात जे घडलं ते लज्जास्पद होतं त्यामुळेच ही कारवाई झाली. एवढा आकांडतांडव करून यांनी काय साधलं हेच कळत नाही.
वेडंवाकडं वागायचं, आरडाओरडा करायचं हे करायचं असेल खुशाल रस्त्यावर करा. सभागृह म्हणजे हे सगळं करण्याची जागा नाही. त्यानंतर भास्कर जाधव यांच्या दालनात घडलं त्यातलं बरचंसं वर्तन सांगितलं पण संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर अंगावर शिसारी यावी असाच तो प्रकार होता. या देशात, राज्यात असा चुकीचा पायंडा पडायला नको, त्यासाठी प्रत्येकाने आपली मर्यादा काय समजून घ्यायला हवं असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सभागृहात जे घडलं त्यामुळे मला वाईट वाटलं. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण भास्कर जाधव यांच्या दालनात जे काही घडलं ते मी ऐकलं ते कुणीही ऐकलं तरीही तुम्ही त्या घटनेचा निषेधच कराल. आम्ही काही त्यांना सांगितलं नव्हतं असं काही करा म्हणून त्यामुळे आमच्या बारा आमदारांची यादी राज्यपालांकडे आहे म्हणून आम्ही बारा आमदारांवर कारवाई केली का या प्रश्नाला काही अर्थ नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT