महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसंच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अधिवेशनाच्या आधी विस्तार होईल असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)?
दिल्लीतल्या नेत्यांची आम्ही आज सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्हिजन काय आहे ते समजून घेण्यासाठी आम्ही दिल्लीत आलो आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसही होते. तसंच लवकरच मंत्रिमंडळ विस्तारावर निर्णय घेतला जाईल. रविवारी आषाढी एकादशी आहे. त्यानंतर अधिवेशनही घ्यायचं आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
आणखी काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आमच्यावर जे काही आरोप केले जात आहेत, महाराष्ट्राचे तुकडे केले जाणार आहेत वगैरे त्यात काहीही तथ्य नाही. जे आरोप करत आहेत त्यांच्याकडे काहीही काम उरलेलं नाही त्यामुळे ते असे आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. खोके पाठवले सांगत आहेत ते कसले खोके मिठाईचे होते का? असा प्रश्न विचारत पैसे वाटप झाल्याचा आरोपही एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला. तसंच संजय राऊत यांना टोलाही लगावला
अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार
आमचं सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे, आमच्या मनात काहीही शंका नाही. आमचं सरकार जे आत्ता आलं आहे ते अडीच वर्षांपूर्वीच यायला हवं होतं. आता लोक आमच्याबाबत विविध चर्चा करत आहेत ते त्यांना करू द्या. महाराष्ट्राचा विकास हे आमचं ध्येय आहे. मध्यवाधी निवडणुकांचीही चर्चा केली जाते आहे मात्र अशी वेळ येणारच नाही कारण आमच्याकडे १६४ आमदारांचं बहुमत आहे. समोर ९९ आमदार आहेत. आमचं हे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. तसंच मी पुढच्या २५ वर्षांसाठीचं बोलत नाही पण यापुढे जी विधानसभा निवडणूक होईल त्यातही आम्ही जिंकून येऊ असाही विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना आम्हाला सभागृहात बोलता येत नव्हतं. वीर सावरकर यांच्याविषयी काही बोलता येत नव्हतं. एवढंच नाही तर हिंदुत्वाविषयी काही भूमिका आम्हाला घेता येत नव्हती. आमच्यावर आरोप केले जात आहेत पैसे घेऊन आले आणि दबावातून आले त्यात काहीही तथ्य नाही. आमच्यापैकी एकही जण पैशांसाठी या ठिकाणी आलेला नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंशी आम्ही चार-पाचवेळा चर्चा केली होती. मात्र आता चर्चेच्या वेळा निघून गेल्या असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT