संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं असून अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिकट होताना दिसतेय. अशातच उस्मानाबाद जिल्हा सरकारी रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रातील काही दृश्य समोर आली आहेत. यामध्ये 2 ज्येष्ठ कोरोनाग्रस्त रुग्णांना खुर्चीवर बसवून ऑक्सिजनचा पुरवठा आणि उपचार दिले जात असल्याचं दिसतंय. शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात बेड न मिळाल्याने अनेक रुग्णांना अश्या प्रकारे उपचार घ्यावे लागलेत. अशा पद्धतीने उपचार घ्यावे लागत असल्याची स्थिती सांगणारे हे फोटो मन पिळवटून टाकणारे आहेत.
ADVERTISEMENT
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या दररोजच्या आकड्याने 600 रुग्णांचा टप्पा पार केला असून जिल्ह्यात 3 हजार 902 अक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 15 दिवसांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून त्याचा ताण आरोग्य यंत्रणावर पडतोय. जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात ही स्तिथी सारखीच आहे. जिल्ह्यात खासगी रुग्णालयातील बेड्स भरले असल्याचं चित्र आहे.
उस्मानाबाद तालुका आणि शहर कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नाहीत. यामुळे अनेक रुग्णांना बेड मंळणे मुश्किल झालंय. एकट्या उस्मानाबाद शहरात 300 पेक्षा जास्त रुग्ण रोज सापडतायत. रूग्णसंख्येसोबत मृत्यूचा आकडाही वाढत आहे.
अनेक नागरिक विनामास्क तसंच विनाकारण फिरत असून कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसतंय. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळणं आणि प्राथमिक लक्षणे दिसल्यावर ती अंगावर न काढता डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य वेळी उपचार घेणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT