रझाकारांनी कडब्याच्या गंजीवर टाकून 7 जणांना जिवंत जाळले; सर्व गाव धायमोकलून रडत होतं

मुंबई तक

• 01:44 PM • 17 Sep 2022

निजामाच्या राज्यात रझाकारांचा अत्याचार वाढतच होता. तसतसं उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्रामासाठी झपाटलेले सैनिक चळवळीत सक्रिय होत होते. उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमा या सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याला लागून असल्याने येथील चळवळ जोर धरू लागली. त्याचं कारण म्हणजे सोलापूर आणि अहमदनगर हे जिल्हे स्वातंत्र्य भारताच्या हद्दीत येत होते. त्यामुळे चळवळ राबवत असताना निजामाच्या पोलिसांना चकवा देण्यासाठी या सीमा […]

Mumbaitak
follow google news

निजामाच्या राज्यात रझाकारांचा अत्याचार वाढतच होता. तसतसं उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्रामासाठी झपाटलेले सैनिक चळवळीत सक्रिय होत होते. उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमा या सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याला लागून असल्याने येथील चळवळ जोर धरू लागली. त्याचं कारण म्हणजे सोलापूर आणि अहमदनगर हे जिल्हे स्वातंत्र्य भारताच्या हद्दीत येत होते. त्यामुळे चळवळ राबवत असताना निजामाच्या पोलिसांना चकवा देण्यासाठी या सीमा भागातील कॅम्पमध्ये भूमिगत होत होते.

हे वाचलं का?

उस्मानाबाद जिल्ह्यातील गौर गावात देखील तरुण स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले होते. गावचे पाटील विठ्लराव पाटील निजामाकडे नोकरी करत असले तरी त्यांची देखील भावना निजामापासून सुटका हीच होती. त्यामुळे गावात निजामांविरोधात होणाऱ्या कारवायांकडे ते दुर्लक्ष करत असे. मात्र गावचा कोतवाल हसन हा रझाकारांचा चेला होता. गौर गावाजवळच येरमाळा हे गाव आहे. त्याठिकाणी रझाकार राहत असे. तसंच येरमाळा गावात निजामाचं पोलीस स्टेशन देखील होतं. याच ठिकाणी कमाल खान नावाचा क्रूर रझाकार राहत होता.

सालार ए खबिरचा आदेश

गौर गावात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. येथील तरुण देशासाठी मरायला देखील तयार होते. कॅम्पसाठी या गावातील लोक धान्य आणि पैसे जमा करायचे. कमाल खानला हसन कोतवालकडून याची कुणकुण लागली होती. त्यामुळे कमाल वरील आदेशाची वाट पाहत होता. अशात गौरीच्या काही तरुणांनी 2 रझाकारांच्या काटा काढला. ही बातमी सालार ए खबिर म्हणजेच रझाकारांच्या जिल्हा प्रमुखपर्यंत पोहचली. सालार ए खबीर ने सालार ए सगिर म्हणजे तालुकाप्रमुखाला गौर गावच्या लोकांना चांगली अद्दल घडवा, असे आदेश दिले.

शेकडो पोलीस आणि रझाकार गौर गावात घुसले

दोन रझाकारांना मारल्याच्या रागात येरमाळा येथील पोलीस, शेकडो रझाकार हत्यारं घेऊन गौर गावात आले. तेथील पोलीस पाटील विठ्ठलराव पाटील आणि अंबादास कुलकर्णी यांना रझाकारांना कोणी मारल्याची विचारणा केली. आम्हाला काही माहित नसल्याचं दोघांनी सांगितलं. खोटं बोलतात का म्हणून दोघांना बेदम मारहाण केली. कोतवाल हसनने काहींचे घरे दाखवली. असेल tya अवस्थेत रझाकारांनी त्यांना बांधून आणलं आणि विचारणा केली. मात्र कोणी काहीच सांगत नव्हतं.

स्वतःचे सरण स्वतःच्या हातून

कोणी काही सांगत नसल्याने रझाकार आणि पोलीस भलतेच चिढले. पोलीस पाटलांसह 7 जणांना गावच्या बाहेर पटांगणात नेलं. तिथे एकाने त्यांना जिवंत जाळू, अशी युक्ती सुचवली. प्रमुखाला ते योग्य वाटलं. जवळचं चिंतामण जैन यांचं शेत होतं. शेतात कडब्याचं ढीग होतं. त्या शेतातून या 7 जणांना. कडबा आणायला सांगितलं. कडब्याचं ढीग वाढत होतं. सातहीजण स्वतःच्या हाताने स्वतःच सरण रचत होते.

कडब्याच्या ढिगात सातही जणांना जिवंत जाळलं

कडबा आणून टाकताना रामा धनगराने रझाकाराला धक्का देत पळ काढला. वाऱ्याच्या वेगाने पाळणाऱ्या रामाला पकडायला रझाकार कुत्र्यासारखं पळत होते. पण गुरांच्या मागे धावणारा आणि लांडग्यांना पळवून लावणारा रामा त्यांच्या हाती काही लागत नव्हता. तितक्यात एकाने घोड्यावरून पाठलाग करत त्याच्या पाठीत गोळी मारली. रामा जमिनीवर पडला. त्याला तिथून फरफटत आणत सर्वांना बेदम मारहाण केली आणि त्यांना बांधून कडब्याच्या ढिगावर ढकलून दिलं. एकाने त्यावर रॉकेल ओतत आग लावली. क्षणात 7 ही जणांचा होरपळून जीव गेला. रझाकार तिथून निघून गेले.

रझाकार कायद्याच्या कचाट्यातुनही सुटले

लोकांनी पाणी टाकून आग विझवली. जळालेले मृतदेह बाहेर काढले. एकाचवेळी गौरगावचे सात जण गेल्याने सारं गाव ओक्सबोक्शी रडत होता. परत एकदा चिता रचली. तशाही अवस्थेत लोकांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. गुन्ह्याची नोंद झाली. पोलिसांचाच गुन्ह्यात समावेश असल्याने तपास सुरु असल्याचा शेरा पोलिसांनी दिला. पुढे स्वातंत्र्याचा जोर वाढला. निजामाची राजवट गेली. 1949 साली खुनातील आरोपी पकडले गेले. 11 पोलीस आणि 20 रझाकारांविरोधात खटला कळंब न्यायालयात सुरु झाला. कमाल खान मुख्य आरोपी होता. त्यावेळी आपल्याकडे इंग्रजांची न्यायप्रणाली असल्याने आपल्याच वकिलांनी कायद्याचा कीस पडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पुढे प्रकरण गुलबर्गा उच्च न्यायालयात गेला. परंतु याकडे कोणी लक्ष दिले नाही.

    follow whatsapp