सत्ताधारी बाकांवर बसलेले गद्दार आहेत, खरी शिवसेना विरोधी बाकांवर बसून जनतेचा आवाज बुलंद करणार असल्याची घोषणा शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी २१ जूनला बंड केल्यापासूनच खरी शिवसेना म्हणजे आम्हीच असा दावा केला आहे. बाळासाहेब ठाकरेंचा विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र या सरकारच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर हल्ला चढवला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे सरकारबाबत?
सत्ताधारी बाकांवर बसलेली शिवसेना नाही तर गद्दार आहेत. खरी शिवसेना विरोधी बाकांवर बसून जनतेचा आवाज बुलंद करणारी आहे. विधानसभा अध्यक्षांनी काहीही म्हटलं तरीही त्यांची नेमणूक घटनाबाह्य आहे. लोकशाहीची हत्या करून बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यात आलं आहे. शिवसेना पक्ष कार्यालयावर आमचाच अधिकार आहे. मात्र या सगळ्या गोष्टी लहानशा आहेत आमच्यासाठी जनतेचा समस्या महत्त्वाच्या आहेत. तुम्ही पाहाल येत्या काळात रस्त्यावर आणि सभागृहात आमचा संघर्ष त्याच अनुषंगाने सुरू राहणार आहे. असं म्हणत आम्हीच खरी शिवसेना असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.
लोकशाहीचा खून ज्यांनी केला त्यांच्या विरोधात आम्ही उभे आहोत
ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांच्या विरोधात आम्ही उभे आहोत, हे गद्दारांचं सरकार असून ते कोसळणारच असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. हे सरकार घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार आहे अशीही टीका आदित्य ठाकरे यांनी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी कधीही गुंडगिरीची भाषा वापरली जात नव्हती. ज्या नव्या पक्षात ते जाऊ इच्छित आहेत तिथे ही भाषा मान्य आहे का? मुख्यमंत्री आणि खरे मुख्यमंत्री यांचा अंकुश राहिलेला नाही असा टोलाही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंनी लगावला.
मी कुणाचाही राजीनामा मागणार नाही, पण महाराष्ट्राची जनताच यांना यांचं स्थान दाखवून देईल. ही गुंडांची भाषा असून महाराष्ट्रात अशी भाषा वापरणाऱ्यांना स्थान नाही. जनतेला धमकवणारे आमदार असे उघडपणे फिरणार असतील तर राज्यात कायदा सुव्यवस्थेची काय अवस्था होईल याचा अंदाज येतो असंही त्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT