मुंबई: तौकताई चक्रीवादळ (Cyclone Tauktae) हे आजवरचं सर्वात भयंकर वादळ असल्याचं म्हटलं जात आहे. खरं तर मुंबईची (Mumbai) रचना ही काहीशी खोबणीत असल्याने आजपर्यंत मुंबईला फार काही त्याचा तडाखा बसलेला नाही. मात्र, कालच्या वादळाने (Cyclone) मुंबईला चांगलाच तडाखा दिला. दरम्यान, 1940 साली जेव्हा चक्रीवादळाला कोणतीही नावं दिली जात नव्हती तेव्हा अरबी समुद्रात एक असं वादळ आलं होतं की, ज्यामुळे मुंबई अक्षरश: हादरून गेली होती. कारण या वादळामुळे मुंबईकरांना पहिल्यांदाच एखाद्या चक्रीवादळाचं एवढं रौद्र रुप पाहायला मिळालं होतं.
ADVERTISEMENT
या चक्रीवादळानंतर अपोलो बंदर, कुलाबा, माझगाव डॉक्स आणि इतर अनेक समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मृतदेह तरंगताना पाहायला मिळाले होते. यावेळी कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा उपलब्ध नसल्याने समुद्रातील हजारो बोटींचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यावेळी झालेल्या वादळामुळे अनेक बोटींना जलसमाधी मिळाली होती. तर त्यांचे अवशेष हे कुलाबा ते शिवडीपर्यंतच्या बंदरापर्यंत पाहायला मिळत होते.
1948 सालाच्या नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा एका चक्रीवादळाने मुंबईला जोरदार तडाखा दिला होता. यावेळी हे वादळ वर्सोवा, दांडा या ठिकाणी धडकलं होतं. त्यामुळे तेव्हा मालवाहू जहाजांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. यावेळी जवळजवळ 100 जणांचा मृत्यू झाला असल्याचा भीती व्यक्त केली होती. ज्यामध्ये मुख्यत: बोटींचे मालक आणि त्यावरील खलाशांचा समावेश होता. त्यावेळी एकट्या मुंबईत सात जणांचा मृत्यू झाला होता तर शेकडो जण जखमी झाले होते. यावरुन आपल्याला वरील दोन्ही वादळाची भीषणता किती होती याचा अंदाज लावता येईल. दरम्यान, या वादळाबाबतचं वृत्त हे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं होतं.
दरम्यान, काल (17 मे) आलेलं तौकताई हे चक्रीवादळ मुंबईतील गेल्या ७० वर्षातील सर्वात भीषण असं चक्रीवादळ होतं. तसंच आतापर्यंत मुंबईच्या सगळ्यात जवळ आलेलं हे वादळ आहे. यामुळे कुलाबा भागात तब्बल ताशी 108 किमी वेगाने वारे वाहत होते.
तज्ज्ञांचे मते, तौकताई हे चक्रीवादळ मुंबईपासून अगदी जवळ (समुद्रात 120 किमी) होतं. इथूनच पुढे ते गुजरातच्या दिशेने सरकलं आणि त्याच वेळी त्याची तीव्रता देखील प्रचंड वाढली होती. शहराच्या अगदी जवळ आलेलं हे चक्रीवादळ म्हणजे निसर्गाने एक प्रकारे दिलेला इशाराच आहे. हवामान बदलाकडे होणारं दुर्लक्ष आणि त्याच्या संभाव्य परिणामांबद्दलचा हा इशारा आहे. असे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या सलग तीन वर्षांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होऊन त्याने पश्चिम किनारपट्टीला तडाखा दिला आहे. 2020 साल निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात हाहाकार उडवून दिला होता. ज्याचा लँडिंग पॉईंट हा अलिबाग होता. तर 2019 साली वायू हे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झालं होतं. जे पश्चिम किनारपट्टीच्या समांतर घोंघावत होतं.
तज्ज्ञांनी सांगितले की चक्रीवादळाची अलीकडील वारंवारता अरबी समुद्रात तापमानात वाढ होण्याचे स्पष्ट चिन्ह आहे. वाढतं चक्रीवादळांचं प्रमाण हे अरबी समुद्रातील तापमान वाढीचे स्पष्ट संकेत आहेत. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जेव्हा गरम, आर्द्र हवा समुद्राच्या पृष्ठभागावरुन वर येते तेव्हा कमी दाबाचा पट्टा तयार होतो. ऐतिहासिकदृष्ट्या, पश्चिम किनाऱ्यावरील समुद्राने बंगालच्या उपसागरापेक्षा कमी वादळं अनुभवली आहेत आणि सामान्यत: ती कमी तीव्र असतात.
‘अरबी समुद्रातील वाढतं तापमान यामुळे केवळ चक्रीवादळच नव्हे तर अतिवृष्टीच्या घटना देखील वारंवार घडत आहे. समुद्रातील वाढत्या तापमानामुळे कमकुवत चक्रीवादळाचं रुपांतर हे अत्यंत झपाट्याने अती तीव्र चक्रीवादळात होत असल्याचं दिसून येत आहे.’ अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी मैथ्यू कौल यांनी दिली आहे.
‘चक्रीवादळ जर समुद्रातच ओसरले तर ते धोकादायक ठरत नाही. पण ज्याप्रमाणे काल तौकताई चक्रीवादळ आणि गेल्या वर्षीच निसर्ग चक्रीवादळ हे किनाऱ्याच्या एवढ्या जवळ येणं हा खंर तर धोक्याचा इशारा आहे. ज्या वेगाने या वादळाची वाटचाल झाली ते लक्षात घेता किनारपट्टी भागातील लोकांचं स्थलांतर करण्यास देखील प्रशासनाला फार कमी वेळ मिळाला आहे. सध्या अरबी समुद्रात अशाप्रकारची वादळं निर्माण होणं हे सातत्याने पाहायला मिळत आहे.’ असं मत अक्षय देवरस, स्वतंत्र हवामानशास्त्रज्ञ आणि यूकेमधील वाचन विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागात पीएचडी विद्यार्थी अक्षय देवरस याने व्यक्त केलं आहे.
दरम्यान, ग्लोबल वॉर्मिंग हा विषय सातत्याने चर्चेला येत आहे. मात्र, त्यावर म्हणाव्या त्या प्रमाणात उपायोजना होत नसल्याने त्याचे गंभीर परिणाम आता झपाट्याने दिसू लागले आहेत.
ADVERTISEMENT