हमहाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मिनी लॉकडाउनची घोषणा केली. वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी सरकारने Break the Chain या उपक्रमाअंतर्गत नवीन नियम व निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी लॉकडाउन लावायचा की नाही या विषयावरुन बराच उहापोह सुरु होता. सरकारमध्येही काही मंत्र्यांचं मत हे लॉकडाउन लावण्यासाठी सकारात्मक होतं तर काहींचा या निर्णयाला विरोध होता. रविवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीतही राज्य सरकारने लॉकडाउनची तयारी केली होती. परंतू लोकांमध्ये तयार झालेल्या संभ्रमांचं आणि भीतीचं वातावरण पाहता सरकारने लॉकडाउन हा शब्द न वापरता खासगी कार्यालयांपासून हॉटेल व्यवसायिकांपर्यंत ते थेट हाऊसिंग सोसायट्या आणि लग्नसोहळ्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत.
ADVERTISEMENT
हे नियम नीट बारकाईने वाचले की आपल्यालाही कळेल की राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनचीच घोषणा केली आहे.
-
राज्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील, तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही.
-
अत्यावश्यक सेवेतील दुकानं वगळता सर्व दुकानं, बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स बंद राहणार
-
विकेंड लॉकडाउनदरम्यान शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व बीच, गार्डन, सार्वजिनक मैदानं बंद राहणार.
-
बँक, वैद्यकीय क्षेत्र आणि अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणारी कार्यालयं वगळता सर्व खासगी ऑफिसेस बंद असणार आहेत.
-
सिनेमा, नाट्यगृह, जिम-वॉटर पार्क, व्हिडीओ गेम पार्लर, क्लब, स्विमींग पूल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंद राहणार
-
मोठ्या प्रमाणात क्रू मेंबर्स नसलेल्या चित्रपट, मालिका आणि जाहीरातींच्या शुटींगना परवानगी मिळाली आहे.
-
रेस्टॉरंट-बार पूर्णपणे बंद, ग्राहकांना आत येऊन खाण्याची परवानगी नाही. फक्त सकाळी सात ते रात्री ८ वाजेपर्यंत पार्सल सेवेला परवानगी. विकेंट लॉकडाउनमध्ये हॉटेलची पार्सल सेवाही बंद राहणार.
-
या हॉटेलमध्ये होम डिलेव्हरीचं काम करणाऱ्या व्यक्तींना आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचं बंधनकारक करण्यात आलंय.
-
राज्यातील सर्व धर्माची प्रार्थनास्थळ भाविकांसाठी बंद राहणार. याव्यतिरीक्त सलून, केशकर्तनालयही बंद राहणार.
-
बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता, शाळा-कॉलेज, खासगी कोचिंग क्लासेस बंद राहणार
-
कोणत्याही प्रकारच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक सोहळ्यांना परवानगी नाही.
-
लग्नसोहळ्यांसाठी ५० जणांची मर्यादा कायम, परंतू हॉलमधील सर्व कर्मचारी आणि सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपली कोरोना चाचणी करवून घेऊन लस घेणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्राशिवाय एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन होत असल्याचं लक्षात आलं तर लग्न हॉल मालकाला १० हजारांचा दंड.
-
रस्त्यावरील खाण्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांना बंदी. सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत फक्त पार्सल आणि होम डिलेव्हरीला परवानगी. परंतू यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल. नियमांचा भंग झाला तर महामारीचा धोका संपेपर्यंत दुकान बंद करण्यात येईल.
-
एखाद्या सोसायटीमध्ये ५ पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली तर ती सोसायटी कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर होईल.
हे सर्व नियम वाचल्यास राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा केल्याचं स्पष्ट होतंय. परंतू मागच्या वर्षात लॉकडाउन काळात राज्याला झालेलं आर्थिक नुकसान लक्षात घेता…अर्थचक्राला खीळ बसू नये यासाठी राज्य सरकारने काही ठराविक गोष्टींना परवानगी दिली आहे. याव्यतिरीक्त सामान्य लोकांना विनाकारण घराबाहेर पडता येणार नाहीये. सध्या राज्यातली कोरोनाची परिस्थिती पाहता सरकारने ही कडक पावलं उचलली आहेत. राज्यात लॉकडाउन लावलं तर सामान्य जनतेमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण तयार होईल असा सूर काल पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीतही उमटला होता. त्यामुळेच लॉकडाउन शब्दाचा उल्लेख टाळून सरकारने राज्यातील जनतेसाठी नवीन नियमांची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT