तृतीयपंथी समाजातील व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टीकोन अद्यापही बदललेला नाही. परंतू तमाशात ढोलकीवादकाचं काम करणाऱ्या बीडच्या बाळूने समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. बीडच्या कंकालेश्वर मंदिरात बाळूने तृतीयपंथातील सपनाशी विवाह केला आहे. दोघांवरही जिवापाड प्रेम करणारे सपना आणि बाळू आज बीडमध्ये एकमेकांचे आयुष्यभरासाठीचे सोबती बनले आहेत.
ADVERTISEMENT
पारंपारिक धार्मिक विधीनुसार सपना आणि बाळूचा विवाह सोहळा आज पार पडला. संपूर्ण मंगलाष्टका झाल्यानंतर बीडमधील पत्रकार आणि सामाजिक संस्थेमधील काही लोकांनी सपनाचं कन्यादान केलं. या विवाहसोहळ्याआधी सपनाच्या घरी मोठ्या उत्साहात हळदीचा सोहळा पार पडला.
सपना आणि बाळूच्या या विवाहसोहळ्याचं राज्यभरातून कौतुक होताना दिसत आहे. दोन वर्षांच्या प्रेमकहाणीनंतर सपना आणि बाळू यांनी लग्नाचा निर्णय घेतला. सपनाने आपल्या आयुष्यात असा दिवस येईल याचा विचारही केला नव्हता. परंतु, बाळूच्या साथीने सपना बहोल्यावर चढली आहे. सकाळी साडेअकरा वाजता बीड शहरातील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर परिसरात सपना- बाळू विवाह बंधनात अडकले आहेत.
बाळू तोडमल हा तरूण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये ढोलकी वाजवण्याचे काम करतो. अशाच एका जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीय सपनाशी बाळूची भेट झाली. सपना ही मुळची बीडची असून कार्यक्रम संपवून बाळू आणि सपना एके दिवशी बीडमध्ये पोहोचले. बाळूला गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा गाडी नव्हती. यासाठी तो सपना सोबतच थांबला आणि इथूनच सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी सुरू झाली.
ADVERTISEMENT