मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या (Bhagat Singh Koshyari) मुंबईबद्दलच्या विधानानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. विविध राजकीय पक्षातील नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे नेत्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण आमदार नितेश राणे, विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप आमदार आशिष शेलार यांनी असहमत असल्याचे म्हटले आहे.
ADVERTISEMENT
राज्यपालांच्या समर्थनार्थ काय म्हणाले नितेश राणे?
राज्यपालांचे समर्थन करत नितेश राणेंनी ट्विट केले होते. ”राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे.. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात. एवढेच कशाला .. तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालत का ? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही ?” अशा आशयाचे ट्विट नितेश राणे यांनी केले होते. पत्रकार परिषदे घेत नितेश राणे म्हणाले ”कालच्या कार्यक्रमाला मी स्वतः होतो आणि इतर लोक प्रतिनिधी उपस्थित होते. राजस्थान, गुजराती समाज त्या ठिकानी होता, त्या ठिकाणी जे भाषण केले त्यात अपमान झाला असता तर आम्ही गप्प बसलो असतो का?” असे नितेश राणे म्हणाले.
प्रसाद लाड काय म्हणाले?
प्रसाद लाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले ”राज्यपालांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. ज्याला घरात ठेवायचं का बाहेर काढायचं उद्धव ठाकरे यांना अधिकार नाही त्यांनी राज्यपालांचा मान ठेवला नाही असे म्हणत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
”राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसाचं जे कार्य, श्रेय आहे ते सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रातही मराठी माणसाने जी प्रगती केली आहे त्याने जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव झालं आहे. वेगवेगळ्या समाजाचं योगदान आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक यांचे योगदान सर्वात जास्त आहे. देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग मोठा आहे.” असे वक्तक्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
राज्यपालांच्या वक्तव्यावर आशिष शेलारांचं स्पष्टीकरण
भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगितले आहे. शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले ”राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये!”
ADVERTISEMENT