आजी-माजी एकत्रित आले तर भावी सहकारी; मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी, भाजपला खुणावलं

मुंबई तक

• 07:13 AM • 17 Sep 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरीत्या भाजपला युतीसाठी इशारा तर केला नाही ना’, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. […]

Mumbaitak
follow google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरीत्या भाजपला युतीसाठी इशारा तर केला नाही ना’, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी शहरातील सिद्धार्थ उद्यानात असलेल्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करुन ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद इमारतीच्या अनावरण कार्यक्रमाला हजेरी लावली.

या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवे यांनी नेहमीच्या शैलीत टोलेबाजी केली.

दानवे यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. यावेळी त्यांनी दानवे यांच्या मुंबई-नागपूर मेट्रो प्रकल्पाबद्दल भाष्य केलं.

मुख्यमंत्री काय म्हणाले…?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातीलाच भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून अप्रत्यक्षपणे ऑफर दिली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘आज मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले, तर भावी सहकारी’, असं म्हणत युतीचे दरवाजे खुले असल्याचे एकप्रकारे संकेतच दिले.

…तरच या सरकारला अर्थ आहे; मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी केल्या मोठ्या घोषणा

‘एकमेकांकडून अपेक्षा असणारच. अपेक्षाशिवाय आयुष्य असूच शकत नाही. आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या, तुम्ही आमच्या कडे व्यक्त करायच्या. पण रावसाहेब आज सर्वांच्यासमोर तुम्हाला शब्द देतो. जर तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेणार असाल, तर हे सरकार तुमच्यासोबत प्रत्येक पावलावर मजबुतीने उभे राहिल. ही आमची इच्छा आणि स्वप्न आहे. ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग होतोय, त्याप्रमाणे मुबई-नागपूर रेल्वेनं जोडायची आहेत’, असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘राजकारणाच्या ठिकाणी राजकारण ठिक आहे. करा. राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. कधी काय घडू द्यायचं ते आपल्या हातात आहे. मार्ग आपल्या हातात असतो. अब्दुल सत्तारजी बोलले पैसे हवेत. मी देतो. पण निधी दिल्यानंतर करणार काय? मार्ग आहे का? जायचं कुठे ते पहिलं ठरवा. म्हणून मला रेल्वे का आवडते, रुळ सोडून इकडे तिकडे जाऊन शकतन नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकतात. पण रुळ सोडून इंजिन जात नाही. तशी दिशा हवी’, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याचं आश्वासन दिलं.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

‘माजी मंत्री म्हणून माझा उल्लेख करू नका. दोन-तीन दिवसात काय ते कळेल’, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केलं होतं. सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने पाटील यांचा उल्लेख माजी मंत्री असा केल्यानंतर त्यांनी हे भाष्य केलं होतं.

    follow whatsapp