आज देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळातील भ्रष्टाचार, पूजा चव्हाण प्रकरण, शेतकरी वीज बिल तोडण्या या आणि अशा अनेक मुद्द्यांवर ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी घेणंदेणं नसल्याचीही टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी नारायण भंडारीची गोष्ट सांगत ठाकरे सरकारवर टीका केली. मला ठाकरे सरकारचा कारभार हा नारायण भंडारीसारखा वाटतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नेमकं काय म्हणाले आपण जाणून घेऊ.
ADVERTISEMENT
ही बातमी वाचलीत का? नाईटलाईफ आणि कोरोनावरून देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
एकदा एका शाळेत वर्गाचा मॉनिटर निवडायचा होता. मॉनिटरच्या निवडीसाठी मास्तर आले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं की तू शाळा सुटल्यावर काय करतोस? त्याने उत्तर दिलं की, मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि पप्पांसाठी भांगेची गोळी घेऊन येतो. मग दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं की तू शाळा सुटल्यावर काय करतोस? तर तो म्हणाला मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि वडिलांसाठी हातभट्टीचा खंबा घेऊन जातो. मग तिसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं तू शाळा सुटल्यावर काय करतोस? तो म्हणाला मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि बाबांच्या चिलमीत गांजा भरून आणतो. यानंतर ते मास्तर प्रचंड नाराज झाले.
तिथे एक चांगला पोरगा बसला होता त्याला हाच प्रश्न मास्तरांनी विचारला. तर त्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं मी घरी जातो, हातपाय धुतो, थोडंसं खातो, त्यानंतर देवाजवळ दिवा लावतो, उदबत्ती लावतो. त्यानंतर स्तोत्रही म्हणतो. अभ्यास करतो, आई वडिलांना थोडीमदत करतो. त्यानंतर माझी काही कामं शिल्लक असतील तर ती मी करतो. हे ऐकून गुरूजी आनंदित झाले. ते म्हणाले वर्गाचा मॉनिटर यालाच करायचं आहे. काय नाव आहे बेटा तुझं तर त्या मुलाने उत्तर दिलं माझं नाव नारायण भंडारी.
सध्या आपल्याला हीच अवस्था आपल्याला राज्यात पाहण्यास मिळते आहे. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आदित्य ठाकरेंवरही टीका
आमचे जे वरळीचे आमदार आहेत पर्यावरण मंत्री आहेत यांचं म्हणणं वरळी मतदारसंघात किती ऐकलं जातं बघा. त्यांचं म्हणणं सगळे तंतोतंत ऐकतात. त्यांनी मागच्या काळात सांगितलं की नाईटलाईफ सुरू झालं पाहिजे. आता कोव्हिडच्या काळातही नाईटलाईफ सुरू आहे. त्यांना माहित नव्हतं लोक काय करतील. त्यांनी चांगल्या, शुद्ध भावनेतून सांगितलं. काल, परवाकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी वरळीतल्या नाईटक्लबमध्ये जाऊन तिथून फेसबुक लाईव्ह केलं. रात्री ११ चे वगैरे नियम जे आहेत ते इतरांकरीता आहेत. कमला क्लबमधल्या यो क्लब, प्रिन्स बार या ठिकाणी फेसबुक लाईव्ह झालं. या लाईव्हमध्ये कितीतरी लोक त्या ठिकाणी होते. मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. कोणीही मास्क घातला नव्हता. त्या ठिकाणी कोव्हिड पसरत नाही. कोव्हिड फक्त मंदिरांमध्ये आणि शिवजयंतीच्या उत्सवात पसरतो.
ADVERTISEMENT