Devendra Fadnavis: टोमण्याला टोमण्याने उत्तर, ठाकरेंना जिव्हारी लागणारं फडणवीसांचं वक्तव्य!

मुंबई तक

08 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:25 AM)

Devendra Fadnavis: मुंबई: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि गुजरात भाजपच्या कौतुकही केलं. मात्र, याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार टोमणे लगावले. भाजपने गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक पत्र लिहून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. पण यावेळी या पत्रातून त्यांनी काही टोमणेही लगावले. त्याच […]

Mumbaitak
follow google news

Devendra Fadnavis: मुंबई: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि गुजरात भाजपच्या कौतुकही केलं. मात्र, याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार टोमणे लगावले. भाजपने गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक पत्र लिहून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. पण यावेळी या पत्रातून त्यांनी काही टोमणेही लगावले. त्याच टोमण्यांना तात्काळ फडणवीसांनी टोमण्याने उत्तर दिलं आहे. (uddhav thackeray has a weapon which is more effective than brahmastra devendra fadnavis taunted to thackeray)

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना कोणता टोमणा मारला

‘उद्धव ठाकरेंजवळ एक अस्त्र हे जे ब्रम्हास्त्रापेक्षाही प्रभावी आहे. ते म्हणजे टोमणेस्त्र… त्यामुळे टोमणे मारल्याशिवाय त्यांचं कोणतंही वाक्य पूर्णच होऊ शकत नाही. मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की, उद्योगाचं महत्त्व उद्धवजींना कळायला लागलं. कारण महाराष्ट्रातील उद्योग घालवणारेच ते आहेत. रिफानयरीचा सर्वात मोठा उद्योग तो उद्धवजींनीच बाहेर घालवला.’ असा टोमणा देवेंद्र फडणवीसांनी यावेळी लगावला.

‘मला असं वाटतं की, अशाप्रकारचा विजय मिळाल्यानंतर आपल्या विरोधी विचारांच्या लोकांचं तोंडभरुन कौतुक करायचं असतं. पण अजून ते त्या मानसिकतेपर्यंत पोहचलेले नाहीत. अजूनही जे काही महाराष्ट्रात घडलं त्याचा परिणाम त्यांच्या मनावर मला अजून दिसतंय.’ अशा बोचऱ्या शब्दात उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे.

महाराष्ट्राचे पळवलेले उद्योग फळाला आले : उद्धव ठाकरेंकडून PM मोदींंचं खोचक शब्दात अभिनंदन

कशा दिल्या होत्या उद्धव ठाकरेंनी खोचक शुभेच्छा?

‘गुजरात विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे. गुजरातसोबत हिमाचल प्रदेश विधानसभेचाही निकाल लागला. तिथं काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. तर दिल्ली ‘मनपा ‘ निवडणुकीत ‘आप’ने भाजपवर मात केली.’

‘गुजरातचा निकाल काहीसा अपेक्षितच होता. गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळेच जनतेने भाजपला भरघोस मतदान केले. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते.’

‘पंतप्रधान मोदी हे 11 तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून ते इथंही भरघोस घोषणा करतील ही अपेक्षा. तसंच आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हे स्पष्टही झाले. पण असो, ज्याचं त्याचं राजकारण सोयीनुसार चालत असतं.’ अशा खोचक शुभेच्छा उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मोदींना दिल्या होत्या.

Gujarat: हार्दिक, जिग्नेश, अल्पेश.. गुजरात निवडणुकीत ‘या’ तरुण त्रिकुटाची काय आहे अवस्था?

‘काँग्रेसला फक्त 1 टक्के जास्त मतं मिळाली’

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत त्यांना हिमाचल प्रदेशमधील पराभवाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, ‘हे खरं आहे की, हिमाचल प्रदेशमध्ये अपेक्षित यश भाजपला मिळालं नाही. पण हिमाचलमध्ये एक प्रथा राहिलीय की, दर पाच वर्षांनी येथील सरकार बदलतं. यावर्षी आम्हाला अशी अपेक्षा होती की, आम्ही हा ट्रेंड रोखू शकू. हिमाचलमध्ये मिळालेली मतं चांगली आहे. पण आमच्यापेक्षा एक टक्का मत जास्त काँग्रेसला आहेत. पण त्या एक टक्क्यामुळे त्यांना बहुमत मिळालंय. मात्र तरी देखील आम्हाला जागा काही कमी मिळालेल्या नाहीत. मतं देखील आम्हाला चांगली मिळाली आहेत. भाजप त्या ठिकाणी अजून मेहनत करेल.’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.

    follow whatsapp