Uddhav Thackeray Interview : शिवसेनेचे (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आवाज कुणाचा पॉडकास्ट’ला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदींसह भाजपला लक्ष्य केले. उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. बावनकुळेंनी ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली उडवत टीकास्त्र डागलंय.
ADVERTISEMENT
“मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत… भन्नाट!”, अशी टिंगल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. “हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल कलानगर शेजारील मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करत आहेत”, असंही बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे, आता लोकांना दोष देताहेत – भाजप प्रदेशाध्यक्ष
विरोधकांची इंडिया आघाडी अस्तित्वात आल्यानंतर भाजपनेही एनडीएची जुळवा जुळव सुरू केली आहे. नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणालेले की, “बऱ्याच वर्षांनंतर या देशात ‘एनडीए’ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं आणि आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची ‘इंडिया’ नावाची एक आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी आपल्या पंतप्रधानांनी एकदम आपल्या आठवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या ठेवणीतल्या. आणि छत्तीस पक्षांची जेवणावळ त्यांनी घातली. खरं म्हणजे, छत्तीस पक्षांची त्यांना गरज नाहीय. त्यांच्या ‘एनडीए’मध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत.”
वाचा >> Lok Sabha 2024 : मोदी-शाह ‘एनडीए’ची एकजूट राहण्यासाठी ‘हा’ तिढा कसा सोडवणार?
उद्धव ठाकरेंनी केलेल्या याच विधानाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे. उद्धव ठाकरे, तुम्हाला तुमच्या आमदारांचं नेतृत्व करता आलं नाही. ते तुमच्या नाकर्तेपणामुळे नाकाखालून निघून गेले. मुख्यमंत्री असताना तुम्ही मातोश्री बाहेर पडले नाहीत आणि आता लोकांना दोष देत आहात”, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
‘घरात बसून…’, ठाकरेंना सुनावलं
“कुटनीतीला कुटण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. कारण 2019 साली युतीत निवडणूक लढून तुम्ही महागद्दारी केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. तेव्हांच तुम्ही नितीमत्ता पायाखाली तुडवली होती. त्यामुळे घरात बसून निती-अनितीच्या गप्पा तुम्ही मारु नका”, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
वाचा >> Raj Thackeray : ‘हे नितीन गडकरींचं अपयश, महाराष्ट्राचं दुर्दैव’, राज ठाकरे का भडकले?
“घराणेशाही टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या ‘इस्ट इंडिया‘ कंपनीचं कडबोळं आता लोकशाही टिकवण्याच्या गप्पा मारत आहेत. मी, माझं कुटुंब आणि माझा मुलगा एवढाच विचार करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे”, अशा उपरोधिक भाषेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT