मुंबई: शिवसेनेचा यंदाचा मेळावा परवानगीच्या फेऱ्यात अडकला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक गोष्टीवा आव्हान देत आहेत. त्याच पद्धतीनं त्यांनी दसरा मेळाव्यावरतीही आपला दावा केला आहे. शिवाजी पार्क मैदानासाठी दोन्ही गटांनी अर्ज केलेला आहे. त्यामुळे महापालिका कोणाला परवानगी देणार हे निश्चित नाहीये. त्याचसाठी आता उद्धव ठाकरेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार अनिल देसाईंमार्फत याचीका दाखल करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा परवानगीच्या फेऱ्यात
शिवतीर्थावरती शिवसेनेचा दसरा मेळावा गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. अगोदर बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेत आहेत. परंतु शिंदे गटाने बंड केल्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेवरती आपला दावा ठोकला आहे. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक राजकीय हालचालींना एकनाथ शिंदे आव्हान देत आहेत.
एकनाथ शिंदेंनी चिन्हावर देखील दावा केलेला आहे. याअगोदर एकनाथ शिंदे गटाला बीकेसीतील मैदान मिळालेलं आहे, परंतु शिंदे गटातील नेत्यांची आणि आमदरांची इच्छा आहे की मेळावा शिवाजी पार्कवरतीच झाला पाहिजे. शिंदे गटाच्यावतीनं सदा सरवणकर यांनी महापालिकेत अर्ज केला होता. आता मैदानाचा हा वाद कोर्टात गेला आहे, त्यामुळे कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
उद्धव ठाकरेंची गोरेगावमध्ये आज सभा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा पार पडणार आहे. त्यामध्ये बऱ्याच कालावधीनंतर उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांचं रणशिंग उद्धव ठाकरे फुंकणार आहेत. आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे मेळावा घेत आहेत, तर तिकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आजचा शिवसेनेचा मेळावा महत्त्वाचा असणार आहे कारण आगामी काळात दसरा मेळावा देखील होणार आहे. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय भाष्य करतात, कोणावरती निशाणा साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
दसरा मेळाव्याबाबत बोलतावा उदय सामंत म्हणाले ” शिवाजी पार्कवरती मेळावा होणार का नाही याबाबत स्वत: एकनाथ शिंदे बोलतील. मेळावा कुठे करायचा याबाबत मुख्यमंत्रीच बोलतील. आम्ही दुसरं एक मैदान देखील बूक करुन ठेवलेलं आहे, परंतु शिवतीर्थावरच आमचा मेळावा व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा असल्याचं”.
ADVERTISEMENT