मुंबईतील साकीनाका परिसरात बलात्काराच्या घटनेला २४ तास होत नाही तोच उपनगरातील उल्हासनग रेल्वे स्थानकात १४ वर्षीय मुलीवर हातोड्याचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असली, तरीही गुन्हा घटतेवेळी आणि घडल्यानंतर पोलीस यंत्रणेची अनास्था पुन्हा एकदा समोर आली आहे.
ADVERTISEMENT
मुलीसोबत असलेल्या मुलाला आरोपीने हातोड्याचा धाक दाखवून पळवून लावलं. यानंतर तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी ज्या स्कायवॉकवर हा प्रकार घडला तिकडे सीसीटीव्हीच नसल्याचं समोर आलंय. तसेच या स्कायवॉकवर पोलिसांचा पहाराही नव्हता. या घटनेतील एका अल्पवयीन साक्षीदाराला हा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागल्या. हद्दीची कारणं देऊन दोन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार घेण्यास नकार दिल्याचं कळतंय. आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडितेलाही तक्रार नोंदवण्यासाठी असाच त्रास सहन करावा लागला.
सकाळी साडेआठ वाजता आरोपीने ठेवलेल्या ठिकाणावरुन सुटका झाल्यानंतर साडेबारा ते पाऊण वाजल्याच्या दरम्यान कल्याण रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला. गेल्या आठवडाभरापासून राज्यात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. त्यातचं रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी उल्हासनगर प्रकरणाविषयी माहिती देताना पोलीस यंत्रणेची हतबलताच बोलून दाखवली आहे.
गेल्या काही वर्षांपासून रेल्वे पोलीसांच्या संख्याबळात वाढ झालेली नाही. रेल्वे स्थानकावर सुरक्षा आणि गुन्ह्याचा तपास हे रेल्वे पोलिसांचं काम आहे, परंतू माणसांची कमतरता ही आमच्यासाठी मोठी समस्या आहे. सध्या आमच्याकडे जेवढा स्टाफ आहे त्यासोबत स्कायवॉक, FOB, रेल्वेचे अंडरपास इथे पेट्रोलिंग शक्य होत नाही.” रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
धक्कादायक ! दुचाकी अडवत महिलेला कारमध्ये टाकलं, बलात्कार करत काढले अश्लील फोटो, नाशिक हादरलं
सध्या आम्ही आहे त्या स्टाफमध्ये काम करत आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे स्थानकांची वाढ झाली असून इन्फ्रास्ट्रक्चरही बदललेलं आहे. परंतू या तुलनेत स्टाफ वाढलेला नाही. रेल्वे पोलिसांच्या संख्याबळात वाढ होणं गरजेचं आहे. परंतू ही सोपी प्रक्रीया नाही. यात राज्य सरकार, केंद्र सरकार आणि रेल्वे बोर्ड अशा तिन्ही यंत्रणांचा सहभाग असतो असंही खालिद म्हणाले. सध्या मुंबईत रेल्वे पोलिसांत ३८०० पोलीस कर्मचारी असून ६५० जागा अद्याप रिकाम्या आहेत. यापैकी फक्त ८६ कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग सुरु असल्याची माहिती खालिद यांनी दिली आहे.
याआधी राज्य सरकारतर्फे रेल्वे पोलिसांना होमगार्ड्सची मदत मिळायची. परंतू १ जुलैपासून ही मदत मिळणंही बंद झालंय. प्रत्येक ठिकाणी पोलीस अधिकारी तैनात करणं शक्य नसल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलं. या प्रकरणी राज्य सरकारशी पाठपुरावा सुरु असल्याचं कैसर खालिद म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी श्रीकांत गायकवाडला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी उल्हासनगर परिसरात आपल्या आजीसोबत राहते. ती आपल्या आईला भेटण्यासाठी शिर्डीला गेली होती. शिर्डीवरून शुक्रवारी रात्री (१० सप्टेंबर) ९ वाजण्याच्या सुमारास बसने ती कल्याणपर्यंत आली. कल्याणमध्ये लोकल पकडून ती उल्हासनगर स्थानकात पोचली. उल्हासनगर स्थानकात उतरल्यानंतर स्कायवॉकवर तिला काही मित्र भेटले. त्यामुळे ती त्यांच्यासमवेत बोलत उभी होती. याचवेळी आरोपी श्रीकांत गायकवाड हा माथेफिरू तरुण तिथे आला. त्याने हातातील हातोडीने तिच्या मित्रांना धाक दाखवत पळवून लावले. यानंतर हा अपराध घडला.
ADVERTISEMENT