भाजपच्या मिशन बारामतीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामतीत आल्या आहेत. मात्र या दौऱ्यातच भाजप कार्यकर्त्यावर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन भडकल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यातल्या सासवडमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या बुथ कमिटीची मिटिंग होती. त्यानंतर ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
नेमकी काय घडली ही घटना?
भाजपच्या बुथ कमिटीची मिटिंग झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन निघाल्या. त्यानंतर त्या कारच्या दिशेने चालत होत्या. त्या कारमध्ये बसल्या. त्याचवेळी तिकडे भाजपचा एक कार्यकर्ता त्यांच्याकडे आला. सासवडमध्ये याच भाजप कार्यकर्त्याच्या घरी भाजपची बुथ कमिटीची बैठक झाली होती. त्याने निर्मला सीतारामन यांना हे सांगितलं की मला आणि माझ्या कुटुंबीयांना तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे. आम्ही सगळेजण सकाळपासून तुम्हाला भेटण्यासाठी वाट पाहतो आहोत. हे ऐकल्यावर निर्मला सीतारामन चांगल्याच नाराज झाल्या. कॅमेरात हे दृश्य टीपलं गेलं आहे.
यानंतर नेमकं काय घडलं?
निर्मला सीतारामन चिडल्या हे पाहून त्यांना इतर कार्यकर्त्यांनीही सांगितलं की ज्या कार्यकर्त्याच्या घरी बैठक झाली त्यांचे वडील गेल्यानंतर त्यांनी भाजपसाठी काम केलं आहे. त्यामुळे ते फोटो काढण्यासाठी आग्रही आहेत. हे कळल्यानंतर निर्मला सीतारामन या कारमधून उतरल्या. भाजप कार्यकर्त्याच्या घरी पुन्हा थोड्यावेळासाठी गेल्या. त्यानंतर त्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी केलेलं स्वागतही स्वीकारलं आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले.
मिशन बारामती नेमकं काय आहे?
भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मिशन बारामती आखलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकून शरद पवार पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते. गेली अनेक वर्ष बारामतीवर पवार घराण्याचं निर्विवाद वर्चस्व आहे. सुप्रिया सुळे दोन वेळा लोकसभेवरती निवडून गेल्या आहेत. अजित पवार बारामतीमधून आमदार आहेत. त्यामुळे याच बारामतीमध्ये राष्ट्रवादीला आव्हान देण्याचं भाजपनं ठरवलं आहे. हेच भाजपचं मिशन बारामती आहे. त्याची सुरूवात निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याने झाली खरी. मात्र भाजप कार्यकर्त्यावर त्या चिडल्या होत्या जी दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत. त्यामुळे निर्मला सीतारामन का चिडल्या अशी चर्चा सासवडमध्ये सुरू झाली आहे.
निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याबाबत अजित पवार काय म्हणाले होते?
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांना बारातमी लोकसभेची जबाबदारी दिल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना माजी उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार म्हणाले ”अमुक अमुक जण बारामतीला येणार आहेत, तुमचं काय म्हणणं आहे. अरे येऊदे ना बारामतीला, बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का? ती सर्वाची आहे. उद्या तुम्हाला ही वाटलं तर तुम्ही पण येणार ना आणि आलेल्यांचे स्वागत करणं ही आपली परंपरा आहे. त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे. कोणी नेते महाराष्ट्रात आले येऊद्या त्यांचा अधिकार आहे. आम्ही कधी दुसऱ्या राज्यात गेलो तर ते म्हणतात का अजित पवार इकडे कशाला आले” असं म्हणत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली होती.
ADVERTISEMENT