निवडणुका लागल्या की, राजकीय नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तहानभूक विसरून जातात. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या क्लृत्या केल्या जातात. या सगळ्यात कधीकधी नियोजन फसत आणि केलेल्या धावपळीचं काही चीज होतं नाही. असंच आज मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर घडलं. उत्तर प्रदेशातील मतदारांच्या भेटीसाठी गेलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रचार न करताच परतावं लागलं.
ADVERTISEMENT
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत. यात उत्तर प्रदेशातील निवडणूक महत्त्वाची असून, या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचंच लक्ष लागलं आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, एआयएमआयए या पक्षांसह अनेक राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार मैदानात उतरवले आहेत.
वांद्रे स्थानकावर मजुरांची गर्दी काँग्रेसने जमवली होती?; पोलिसांनी कुणाला केली होती अटक?
काँग्रेस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश निवडणूक लढवत असून, उत्तर प्रदेशातील मतदार रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या संख्येनं मुंबईत आहेत. मतदानासाठी हा मतदार आता उत्तर प्रदेशात जात असून, या मतदारांशी संवाद साधण्यासाठी आणि काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट लोकमान्य टिळक टर्मिनसवर जाण्याचं नियोजन केलेलं होतं.
सायंकाळी 5 वाजता नाना पटोले कुर्ला टर्मिनसवर जाऊन घराकडे परतणाऱ्या उत्तर भारतीय मतदारांना आवाहन करणार होते. ठरल्याप्रमाणे नाना पटोले कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचलेही. मात्र, नाना पटोले स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच उत्तर प्रदेशात जाणारी रेल्वे गाडी निघून गेली होती. त्यामुळे संपूर्ण नियोजनच निष्फळ ठरलं. नाना पटोलेंना लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रिकाम्या हातीच परतावं लागलं.
ADVERTISEMENT