देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे वाढत जाणारे रुग्ण पाहता केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या पार्श्वभूमीवर देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना मोदींनी देशातल्या लसीकरण मोहीमेने केलेल्या प्रगतीविषयी भाष्य करताना १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीमेची घोषणा केली.
ADVERTISEMENT
३ जानेवारीपासून देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. त्यांच्याच प्रयत्नामुळे आज देशातील ९० टक्के जनतेला कोरोना लसीचा किमान एक डोस मिळाल्याचं मोदी म्हणाले. कोरोनाशी लढताना देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे, त्यामुळेच या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनापासून संरक्षण मिळावं यासाठी १० जानेवारीपासून लसीचा बूस्टर डोस दिला जाणार असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. जगभरात अनेक देश ओमिक्रॉनच्या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्यानंतर लसीचा आणखी बूस्टर डोस मिळणार असल्याचं मोदींनी सांगितलं. हा बूस्टर डोसही १० जानेवारीपासून मिळणार असल्याचं मोदी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. लसीकरणाबद्दल पसरवण्यात येणाऱ्या अफवांकडे आपण लक्ष द्यायला नको असं मोदी म्हणाले. आपण आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीच्या जोरावर सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली आहे. त्यामुळे देशाचं कोरोनापासून रक्षण करणं ही आपली जबाबदारी असल्याचं मोदी यावेळी बोलताना म्हणाले.
ADVERTISEMENT