रोज सहा लाख लसी देण्याचं लक्ष्य महाराष्ट्र सरकारने ठेवलं आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिमेत अडसर येतो आहे असं वक्तव्य महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. गावागावांमध्ये ४५ वर्षे आणि त्यावरील वयाच्या लोकांना लस देण्यात येते आहे. मात्र लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं. त्यांना लस पुरवण्यासाठी पोटतिडकीने विनंती केली आहे असंही राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. कोव्हॅक्सिन या लसीची मागणी महाराष्ट्रात जास्त होते आहे त्यामुळे कोव्हॅक्सिन आधी द्या त्यानंतर कोव्हिशिल्ड लसी पुरवा असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
25 वर्षांवरील सगळ्यांना लस द्या, उद्धव ठाकरेंची मागणी केंद्र सरकारने फेटाळली
दुसरी मागणी आम्ही ही केली आहे की महाराष्ट्रात कामासाठी बाहेर फिरणारा जो वर्ग आहे तो खासकरून २० वर्षे आणि त्यावरील आहे. त्यामुळे वय वर्षे २५ आणि त्यावरील सर्व वयोगटातील सगळ्यांना लस देण्यात यावी अशीही मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
लसींबाबत काय म्हणाले आहेत राजेश टोपे?
सध्या महाराष्ट्रात १४ लाख लसी आहेत. मात्र हा साठा पुढील ३ दिवसांमध्ये संपेल. आम्हाला आणखी ४० लाख लसींची आवश्यकता आहे. दर आठवड्याला ४० लाख लसी देण्यात याव्यात अशी विनंती आम्ही केंद्राला केली आहे. केंद्राकडून व्हॅक्सिनचा पुरवठा होतो आहे मात्र त्याचा वेग कमी आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळे येत आहेत. जी बाब लसींची तीच ऑक्सिजनच्या पुरवठ्याचीही.. ऑक्सिजनचा तुडवडा राज्यात जाणवू लागला आहे. त्यामुळे आम्हाला शेजारच्या राज्यांकडून ऑक्सिजन घ्यावा लागतो आहे. जर गरज पडली तर इंडस्ट्रीजना लागणारा ऑक्सिजनही आम्हाला बंद करावा लागेल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यात कोरोनाचा कहर प्रचंड वाढला आहे. या काळात कुणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची विनंती देवेंद्र फडणवीस यांनाही केली आहे. त्यांनीही सहकार्य करण्याचं मान्य केलं आहे. तरीही निर्बंधांच्या विरोधात कुणालाही चिथवण्याचं काम विरोधी पक्षाने करू नये अशी विनंती पुन्हा एकदा मी करतो आहे. जेव्हा निर्बंध शिथील करण्याची वेळ आली आहे असं वाटेल तेव्हा ते नक्की शिथील केले जातील असंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात नवा स्ट्रेन?
आम्हाला अशी शंका येते आहे की महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेनही आला आहे. या स्ट्रेनमुळे जास्तीत जास्त लोकांना कमी कालावधीत कोरोनाची बाधा होते आहे. आम्ही काही नमुने हे तपासणीसाठी NCDC कडे पाठवले आहेत. त्यांनी आम्हाला यासंबंधीचा अहवाल दिल्यानंतरच यासंबंधातली स्पष्टता येईल.
ADVERTISEMENT