भोंगे असणाऱ्या मशिदींबाहेर हनुमान चालीसा वाजवण्याच्या भूमिकेबद्दल राज ठाकरेंनी उत्तर सभा घेतली. मात्र, या सभेतूनही पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचं मन वळण्यात राज ठाकरे अपयशी ठरल्याचं दिसत आहे. पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणाऱ्या हनुमान चालीसा पठणाकडे मोरेंनी पाठ फिरवली आहे. तसं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडव्याला झालेल्या मेळाव्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा मांडला आणि अजान पठणावेळी भोंग्याचा वापर करणाऱ्या मशिदींबाहेर हनुमान चालीसा वाजण्याचंही जाहीर केलं.
राज ठाकरे यांच्या भूमिकेवर काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली, तर काहींनी थेट राजीनामेच दिले. हनुमान चालीसा वाजवण्याच्या मुद्द्यावर मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष मोरेंनीही नाराजीचा सूर लावला होता. त्यामुळे त्यांना शिवतिर्थावरून बोलावणं आलं.
शिवतिर्थावर राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मोरेंनी जय श्रीरामचा जयघोष केला आणि ठाण्याच्या उत्तर सभेत भाषणही ठोकलं. मोरेंचं ठाण्यातील सभेतील भाषणही वेगळं होतं. मात्र, हनुमान चालीसा वाजवण्याच्या मुद्दावर मोरे अजूनही नाराज असल्याचंच दिसत आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई, ठाण्यातील सभेनंतर राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यात हनुमान चालीसा पठणाचं सामूहिक आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र, वसंत मोरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं दिसत आहे.
वसंत मोरेंचं भूमिका काय?
शनिवारी (१६ एप्रिल) सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला वसंत मोरे उपस्थित राहणार की नाही, असा प्रश्न चर्चिला जात आहे. मात्र, आता वसंत मोरेंनी हा कार्यक्रम पक्षाचा नसल्याचं म्हटलं आहे. “उद्याचा कार्यक्रम हा पक्षाचा नाही. तो अजय शिंदे यांचा कार्यक्रम आहे. मला अद्याप कार्यक्रमाचं निमंत्रण आलेल नाही. त्यामुळे मी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही,’ असं मोरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही मोरेंनी म्हटलं आहे.
वसंत मोरे ठाण्याच्या सभेत काय म्हणाले होते?
“राज ठाकरेंनी ब्ल्यू प्रिंट दिली. मी आणि साईनाथ महापालिकेत आहोत. ब्ल्यू प्रिंटमध्ये काय काम केलं ते बघायचं असेल, तर कात्रज आणि कोंढव्यामध्ये या. आम्ही दोन नगरसेवकांनी विकास केलाय. शंभर-शंभर नगरसेवकांची सत्ता असताना काम होऊ शकत नाही, पण दोन नगरसेवक काम करतात.”
“मला वाटतं की, प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम केलं पाहिजे. राजू पाटील यांना कोणत्याही कार्यक्रमाला नेलं की आपण एकच गाणं वाजवतो. फक्त गाण्यापुरतं मर्यादित राहणार आहे का? आपल्याला राजू पाटलांचं काम, अविनाश जाधवांचं काम लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत की नाही?”
“गाणी वाजवून चालणार नाही. त्यांचं काम सांगावं लागेल. आम्ही महापालिकेत ब्ल्यू प्रिंटच्या आधाराने काम केलं. १६ वर्षात १६ गार्डन करणारा एकमेव नगरसेवक आहे. आपण या गोष्टी बघितल्या पाहिजेत. मला चर्चेतील चेहरा पुरस्कार दिला गेला. त्यावेळी चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे होत्या. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘तुम्ही भाजपत या, नगरसेवक व्हाल.’ मी त्यांना सांगितलं की, १५ वर्षांपासून भाजपच्याच नगरसेवकाला पाडून नगरसेवक होतोय. इतकं चांगलं काम आम्ही करतोय.”
“मनसेचा विकासात्मक चेहरा आम्ही पुण्यात लोकांपर्यंत नेला आहे. या गोष्टी आपण लक्षात ठेवला पाहिजे. नगरसेवकांनी काम केलं पाहिजे. राज ठाकरेंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा असेल, तर आपल्याला काम करावं लागेल. एकही पक्ष राहिलेला नाही, ज्यांनी मला ऑफर दिली नाही,” असं मोरे म्हणाले होते.
ADVERTISEMENT