काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान वीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. भाजपने यावरून निदर्शनंही केली होती. अशात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती मात्र महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी वीर सावरकरांनी मदत केली होती असं तुषार गांधी यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर तेव्हाच्या पोलिसांच्या अहवालातही गोष्ट नमूद आहे असा दावा त्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे तुषार गांधी यांनी?
नथुराम गोडसेला महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी पिस्तुल पुरवण्यास वीर सावरकरांनी मदत केली. महात्मा गांधी यांची हत्या होण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत नथुराम गोडसेकडे बंदुक नव्हती. मी हे म्हणत नाही तर कपूर आयोगाने ही बाब नमूद केली आहे. २६ आणि २७ जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसे आणि आपटे वीर सावरकरांना भेटले होते. अशी बातमी पोलिसांकडे होती असंही तुषार गांधी यांनी स्पष्ट केलं.
वीर सावरकरांना भेटेपर्यंत नथुरामकडे बंदुक नव्हती
वीर सावरकरांना भेटेपर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. त्यानंतर सावरकरांसोबत बैठक झाल्यानंतर गोडसे तिथून तातडीने दिल्लीला आणि मग ग्वाल्हेरला गेला होता. ग्वाल्हेरला परचुरे म्हणून सावरकरांचे अनुयाची होते. त्यांनाच नथुराम गोडसे भेटला होता. त्यांच्याकडून गोडसेला बंदूक मिळाली असाही दावा तुषार गांधी यांनी केला आहे.
घटनाक्रम लक्षात घेतला तर बंदूक मिळवण्याचा सल्ला कुठून मिळाला असेल ते स्पष्ट होतं. गोडसे मुंबईत बंदूक शोधत होता. मी नवं काहीही सांगत नाही २००७ ला माझं पुस्तक आलं होतं त्यातही ही बाब नमूद आहे तसंच कपूर आयोगाच्या अहवालात ही या गोष्टीचा उल्लेख आहे असंही तुषार गांधी यांनी म्हटलं आहे.
१९३० मध्येही महात्मा गांधी यांना मारण्याचे प्रयत्न झाले होते. त्यावेळी प्रबोधनकार ठाकरेंनी गांधींच्या सहकाऱ्यांना सावध केले होते. त्यानंतर प्रबोधनकारांनी राज्यातील सनातनी हिंदूच्या नेत्यांना खडसावलं होतं.
महात्मा गांधींना मारण्याची मोहीम बस्स करा, ते संत आहेत, असं प्रबोधनकारांनी सांगितलं होतं. हा इतिहास अनेक पुस्तकात आहे. माझ्या पुस्तकातही आहे. उद्धव ठाकरेंनी हा इतिहास लक्षात घेतला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंना भेटून मी त्यांना हा इतिहास सांगितला होता. मी माझ्या मनाने काढलेली ही गोष्ट नाही. त्यावेळी महाराष्ट्रात सनातनी हिंदूंचे नेते कोण होते ही नावे घेण्याची गरज नाही, असंही त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT