गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मुंबईतल्या ब्रीचकँडी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. लतादीदींनी अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर जनसागर लोटला होता. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून उद्धव ठाकरेंपर्यंत अनेक दिग्गजांनी आदरांजली वाहिली. लता मंगेशकर यांच्या भगिनी आशा भोसले यांनी लता मंगेशकरांसोबतचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो लतादीदी आणि आशाताई यांच्या बालपणीचा आहे.
ADVERTISEMENT
आशा भोसले यांनी सोशल मीडियावर लता दीदींसोबतचा बालपणीचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, ‘बचपन के दिन भी क्या दिन थे, दीदी आणि मी.’ आशा ताईंच्या या पोस्टला 50 हजारांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाइक केले आहे. तसेच 1800 पेक्षा जास्त लोकांनी या फोटोला कमेंट करून लता दीदींना श्रद्धांजली वाहिली.
लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 मध्ये लता मंगेशकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून दुखवटा जाहीर केला आहे. राज्य सरकारने आज राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवली त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयातील आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. मात्र शनिवारी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यावेळी सगळ्यांनाच काळजी वाटली होती. त्यानंतर रविवारी सकाळी म्हणजेच 6 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकर यांचं निधन झालं. मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती डॉ. प्रतित समदानी यांनी दिली.
लता मंगेशकर यांना साश्रू नयनांनी निरोप, भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला चितेला अग्नी
ब्रीचकॅन्डी रुग्णालयातून रविवारी दुपारी त्यांचे पार्थिव पेडर रोड येथील प्रभूकुंज निवासस्थानी आणण्यात आले. चित्रपटसृष्टीतील तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी प्रभूकंज येथे लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. पेडर रोड येथून दुपारी चारच्या सुमारास लता मंगेशकर यांची अंत्ययात्रा शिवाजी पार्कच्या दिशेने निघाली. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अंत्ययात्रा शिवाजी पार्क मैदानात पोहोचली. त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अंत्ययात्रा शिवाजी पार्क मैदानात पोहोचल्यानंतर लता मंगेशकर यांचे पार्थिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
ADVERTISEMENT