अमरावती: अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना तेथील खासदार आणि आमदार मात्र अत्यंत बेफिकीर असल्याचं दिसून येत आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे कोरोनाचे सर्व नियम धुडकावून लावत थेट आपल्या बुलेटवरुन जात असल्याचे व्हीडिओ आता समोर आले आहेत.
ADVERTISEMENT
अमरावती, यवतमाळ आणि अकोलामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक देखील बोलावली होती. त्यानंतर या तीनही जिल्ह्यात कोरोनाच्या दृष्टीने काही निर्बंध देखील लावण्यात आलेले आहेत. मात्र असं असताना कोरोनाचे त्रिसूत्री नियम धाब्यावर बसवत जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे आमदार पती हे बुलेटवरुन फिरत असल्याचं समोर आलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ कालचाच (19 फेब्रुवारी) आहे. शिवजयंतीनिमित्त राणा दाम्पत्य हे एका कार्यक्रमाला जात असताना त्यांनी कोरोनासंबंधीचे अत्यंत महत्त्वाचे नियम मोडल्याचं निदर्शनास आलं आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा हे बुलेटवरुन जात असताना दोघांनीही मास्क घातलेला नव्हता. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा नियम मोडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता दाम्पत्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
ही बातमी पण नक्की पाहा: मास्क, हेल्मेट न घालता बाइक राइड, विवेक ओबेरॉयवर पोलिसांची कारवाई
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर अटोकाट प्रयत्न करत आहे. पण असं असलं तरीही जर लोकप्रतिनिधीच स्वत: अशाप्रकारे नियम मोडून सार्वजनिक ठिकाणी जात असतील तर त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये मात्र चुकीचा मेसेज जाऊ शकतो आणि ज्याचे गंभीर परिणाम देखील होऊ शकतात.
विवेक ओबेरॉयप्रमाणेच राणा दाम्पत्यावर पण कारवाई होणार?
दरम्यान, 14 फेब्रुवारीला बाइकवरुन विनामास्क फेरफटका मारणाऱ्या अभिनेता विवेक ओबेरॉयविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे विवेक ओबेरॉयविरोधात जी कारवाई करण्यात आली तशीच कारवाई राणा दाम्पत्यावर देखील करण्यात येणार का? असा सवाल विचारला जात आहे.
ADVERTISEMENT