राज्यात राज्यसभा निवडणुकीचा गुलाल खाली बसत नाही, तोच विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये. राज्यसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत आघाडी सावध झाल्याचं दिसतंय. दुसरीकडे भाजपकडूनही राज्यसभा निकालाची पुनरावृत्ती करण्याचा दावा केला जातोय. त्यामुळे कोण कुणाचा कार्यक्रम करणार याची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत चाललीये.
ADVERTISEMENT
विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. त्यासाठी एकूण १२ अर्ज दाखल झाले होते. मात्र, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली. तरीही विधान परिषद निवडणुकीतील चुरस कायम आहे.
विधान परिषद निवडणुकीतील चित्र थोडं वेगळं आहे. राज्यसभेला शिवसेनेनं जास्तीचा उमेदवार दिला होता. तर यावेळी काँग्रेसनं भाई जगताप यांना उमेदवारी दिलीये.
तीन पक्ष, ११ उमेदवार
विधान परिषदेसाठी भाजपने प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांनी उमेदवारी दिलीये. शिवसेनेनं सचिन अहिर, आमशा पाडवी यांना तिकीट दिलंय. राष्ट्रवादी काँग्रसने भाजपतून आलेल्या एकनाथ खडसेंबरोबर रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने दोन जागांसाठी लागणारा मतांचा कोटा कमी असतानाही चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांनी रिंगणात उतरवलंय.
२७ च्या कोट्यानुसार महाविकास आघाडीची काय आहे स्थिती?
विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला २७ मतांची गरज असेल. या कोट्यानुसार बघितलं तर शिवसेनेकडे ५५ मतं (५५ आमदार) आहेत. त्यामुळे सेनेचे दोन्ही उमेदवार सहज निवडून येतील. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५३ मतं (५३ आमदार) आहेत. त्यामुळे रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनाही अडचण येणार नाही.
खरी अडचण आहे ती काँग्रेसची. काँग्रेसकडे ४४ मतं (४४ आमदार) आहेत. त्यामुळे काँग्रेसचा एक उमेदवार सहज विधान परिषदेत जाईल. दुसरे उमेदवार भाई जगताप यांना विजयी होण्यासाठी बाहेरच्या १० मतांची गरज आहे.
२७ च्या कोट्यानुसार भाजपचं गणित जुळतंय का?
पाच उमेदवार रिंगणात उतरवलेल्या भाजपकडे अपक्षांसह ११३ मतं (आमदार) आहेत. त्यामुळे चार उमेदवार निवडून गेल्यानंतर ५ मतं जास्तीची आहेत. त्यांना ३० मतं जास्तीची लागणार आहेत. म्हणजे काँग्रेसपेक्षा जास्त मतांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे.
२६ च्या कोट्यानुसार कुणाला किती मतांची गरज?
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहे. त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीवेळी मतदान करण्यास सोडण्यात आलं नव्हतं. त्यामुळे यावेळी त्यांना मतदान करता आलं नाही, तर निवडून येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतांचा कोटा २६ वर येईल.
मलिक-देशमुखांनी मतदान केलं नाही, तर राष्ट्रवादी बाहेरच्या एका मतांची गरज पडणार आहे. तर शिवसेनेची तीन मतं जास्तीची असणार आहे. मात्र, काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी ८ मतांची गरज असणार आहे.
या सुत्रांनुसार चार उमेदवार निवडून भाजपकडे ९ मते शिल्लक राहतात. त्यामुळे पाचव्या जागेसाठी भाजपला अधिकच्या मतांची तडजोड करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती.
छोटे पक्ष आणि अपक्ष पुन्हा निर्णायक ठरणार!
बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार, एमआयएमचे २, समाजवादी पक्षाचे २, प्रहारचे २, शेकापचा १, शेक्रांप १, मनसे १, जनसुराज्य १, रासप १ आणि माकप १ आमदार.
अपक्ष आमदारांमध्ये राजेंद्र येड्रावकर, चंद्रकांत पाटील, किशोर जोरगेवार, विनोद अग्रवाल, आशिष जैस्वाल, राजेंद्र राऊत, संजय शिंदे, नरेंद्र भोंडेकर, देवेंद्र भुयार, गीता जैन, मंजुळा गावित, प्रकाश आवाडे, रवि राणा, महेश बालदी यांचा समावेश आहे.
राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार राज्यातील राजकारणात महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे त्यांना जवळ करण्यात कुणाला यश मिळतं, यावर निकालाचं गणित अवलंबून असणार आहे.
ADVERTISEMENT