Vidhan Parishad Election : शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर! एकनाथ शिंदे गुजरातमध्ये

मुंबई तक

• 03:54 AM • 21 Jun 2022

राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ भाजपने महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत विजयाचे दावे करणाऱ्या महाविकास आघाडी पुन्हा तोंडघशी पडलीये. मात्र, या निकालाने शिवसेना आणि काँग्रेसमधील असंतोष समोर आला आहे. त्यातच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून, ते नाराज असल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, या निकालाने चेक मिळालेल्या उद्धव ठाकरे यांनी आज […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ भाजपने महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत विजयाचे दावे करणाऱ्या महाविकास आघाडी पुन्हा तोंडघशी पडलीये. मात्र, या निकालाने शिवसेना आणि काँग्रेसमधील असंतोष समोर आला आहे. त्यातच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून, ते नाराज असल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, या निकालाने चेक मिळालेल्या उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची तातडीने बैठक बोलावली आहे.

हे वाचलं का?

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपनं पुन्हा एकदा बाजी मारली. सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये असंतोष असून, त्यांचा असंतोष बाहेर पडावा म्हणून पाचवा उमेदवार देत असल्याचं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी केलं होतं. त्यांच्या विधानाला निकालाने अप्रत्यक्षपणे दुजोरा मिळाला आहे.

विधान परिषद निवडणुकीत मोठा उलटफेर, फडणवीसांनी MVA ला पुन्हा चारली धूळ!

या निकालाने महाविकास आघाडीला झटका बसला असून, शिवसेनेतील महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे गुजरातमध्ये गेले आहेत. ते सध्या नॉट रिचेबल असून, सध्या ते सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये आहेत. एकनाथ शिंदे निकालानंतर सोमवारी रात्रीच गुजरातमध्ये गेले.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच १३ आमदार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल झाल्याने आता शिवसेनेतील नेत्यांची खदखद पुढे आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक

राज्यसभा निवडणुकीत दुसऱ्या उमेदवाराचा झालेला पराभव, त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत फुटलेली मतं यामुळे शिवसेनेला हादरा बसला आहे. शिवसेनेची समर्थक अपक्षांसह मते फुटली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. दुपारी ही बैठक होणार असून, या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

संजय राऊतांचा दौरा रद्द

विधान परिषद निवडणुकीनंतर अचानक राजकीय घडामोडींना वेग आलाय. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाल्यानंतर ही बैठक होत असून, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी दिल्ली दौरा रद्द केला आहे. दिल्लीत सध्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार निवडीवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे राऊत दिल्लीत जाणार होते.

    follow whatsapp