विरारमधलं अग्नितांडव आणि त्यामध्ये गेलेला 13 जणांचा जीव ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कोव्हिड काळात रूग्णालयांवर प्रचंड ताण आहे. भंडारा, नाशिक आणि विरारमध्ये घडलेल्या घटना या अत्यंत भयंकर आहेत. विरारच्या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या सहवेदना आहेत, प्रत्येक घटनेनंतर मुख्यमंत्री चौकशी करू, फायर ऑडिट करू असं सांगतात. पण प्रत्यक्षात काहीही होत नाही हेच या घटनेवरून दिसतं आहे असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. मुख्यमंत्री प्रत्येक घटनेनंतर म्हणतात की फायर ऑडिट केलं जाईल प्रत्यक्षात काहीही होत नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
मृत्यूचं तांडव… विरारमध्ये कोव्हिड हॉस्पिटलच्या ICU वॉर्डला आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू
आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
विरारच्या विजय वल्लभ रूग्णालयात लागलेली आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. कोव्हिडला लोक आधीच घाबरले आहेत, कोव्हिडचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर होतो आहे अशात हॉस्पिटल्समध्ये या घटना घडल्याने लोकांच्या भीतीत आणखी भर पडते आहे. सातत्याने प्रत्येक घटनेनंतर मुख्यमंत्री आणि प्रशासन आम्ही या घटनेची चौकशी करू असं सांगतात ती होणं तर आवश्यक आहेच. मात्र दरवेळी हे सांगितलं फायर ऑडिट केलं जाईल मात्र अशा प्रकारचं फायर ऑडिट केलं जात नाही.
कोव्हिडच्या काळात हॉस्पिटल्सवर खूप जास्त ताण आहे. अशा स्थितीत काही तरी व्यवस्था सरकारने उभी केली पाहिजे. अशा घटना होणार नाहीत यासाठी जी काळजी सरकारने घेतली पाहिजे. आवश्यक असेल तर यासाठी हॉस्पिटल्सना सरकारने मदतही केली पाहिजे. भंडारा, ईशान्य मुंबई, नाशिक किंवा आता विरार या ठिकाणी घडलेल्या घटना या भयानक आहेत. विरारच्या रूग्णालयात जे इतर रूग्ण आहेत त्याची काळजी घेतली जावी. या प्रकारच्या घटना घडणार नाहीत म्हणून सरकारने प्रभावी पावलं उचलली पाहिजेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
घटना घडली की आपण प्रतिक्रिया देत आहोत पण अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. राज्यातल्या सगळ्या रूग्णालयाचं सेफ्टी ऑडिट होईल यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत नाहीत.
Virar Fire: विरारमधील हॉस्पिटलला भीषण आग, मृतांची यादी आली समोर
काय घडली घटना?
विरारच्या विजय वल्लभ रूग्णालयात पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. या घटनेत 13 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या आगीत मृत्यू झालेल्या 13 जणांपैकी 9 पुरुष आणि 4 महिला आहेत. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न करून त्यांनी ही आग आटोक्यात आणली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, एसीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किंटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय या हॉस्पिटलमध्ये फायर ऑडिट देखील झालं नसल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT