चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा वाढला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणा या दोन्ही धरण समूहातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांना ऐन सणासुदीमध्ये पुन्हा एकदा पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतोय.
ADVERTISEMENT
गंगापूर धरणातील विर्सग वाढल्याने आज गोदावरी नदीच्या तिराकाठच्या दोन्ही बाजूला पुराचे पाणी वाढले. दुथडी भरुन वाहणाऱ्या गोदावरीतील दुतोंड्या मारुतीच्या कमरेला सायंकाळी पाणी लागले. दुपारनंतर दर तीन तासांनी विसर्ग वाढवण्यात आला. गंगापूर दारणेसह नगर जिल्ह्यातील धरणातून आज पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. गंगापूर ४००९, दारणा ७२००, कडवा २५४४, आळंदी ८०, वालदेवी १८३, तर नांदुर मध्यमेश्वर १६५८२ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.
जायकवाडीत पाण्याचा वेग वाढला –
नगर जिल्ह्यातील विविध धरतील विसर्ग बघता जायकवाडी धरणासाठी सरासरी ३२,५९१ क्युसेसने पाणी सोडले जात आहे. गेल्या बारा तासापासून हा विसर्ग सुरु आहे. दरम्यान, चणकापूर ५२८६, हरणबारी २५८८, केळझर ११००, नाग्यासाक्या १०५, ठेगोडा ८३१६ क्युसेसने विसर्ग सुरु आहे. गेल्या १२ तासापासून जायकवाडीसाठी पाणी सोडले जात आहे. सध्या जायकवाडी धरणाची १५१३ .७८ फूट पाण्याची पातळी आहे. जायकवाडीत ५९.७९ टक्के पाणीसाठा आहे.
ADVERTISEMENT