कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत कुठे कमी पडलो याचा अभ्यास करतो आहोत-चंद्रकांत पाटील

मुंबई तक

• 09:14 AM • 16 Apr 2022

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत आम्ही कुठे कमी पडलो याचा अभ्यास आम्ही करतो आहोत. काही वेळापूर्वीच आम्ही त्याचं विश्लेषण करण्याची सुरूवात केली आहे. आमचा मुद्दा विकासाचा होता मात्र जनतेने जो निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीचे निकाल आज जाहीर […]

Mumbaitak
follow google news

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत आम्ही कुठे कमी पडलो याचा अभ्यास आम्ही करतो आहोत. काही वेळापूर्वीच आम्ही त्याचं विश्लेषण करण्याची सुरूवात केली आहे. आमचा मुद्दा विकासाचा होता मात्र जनतेने जो निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. त्यात काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात आमदार निवडून आणण्याच्या भाजपच्या स्वप्नावर विरजण पडलं आहे.

या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधवांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांना आस्मान दाखवलं आहे. या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. जयश्री जाधव या जिंकल्या आहेत चांगली गोष्ट आहे. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे सत्यजीत कदम जिंकतील असा विश्वास वाटत होता. जयश्री जाधव जिंकल्या आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

‘आम्हांला मतदारांचा निर्णय मान्य आहे. आमचा मुद्दा विकासाचा होता. आम्ही वारंवार मांडत होतो की काँग्रेसने 50 वर्ष केंद्रात, राज्यात आणि शहरात काय केलं हे मांडा. आम्ही पाच वर्षात काय केलं हे मांडतो. मात्र आम्हांला राज्यात केवळ पाच वर्षे मिळाली. शहराच्या विकासासाठीचे अनेक प्रकल्प आम्ही केंद्राकडून मंजूर करुन घेतले आहेत. आता त्यांची टेंडर प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे विकास हाच आमचा मूळ मुद्दा होता.’

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४१६ मतं पडली. तीन पक्ष विरूद्ध एक पक्ष अशी ही पोटनिवडणूक झाली. तिन्ही पक्षांनी या ठिकाणी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. तसं असूनही आम्ही ७७ हजारांहून अधिक मतं मिळवत महाविकास आघाडीच्या तोंडाला फेस आणला होता. शेवटच्या पाच ते सहा फेऱ्या या निर्णायक असतात त्यात काहीही होऊ शकतं असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला होता असंही चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

    follow whatsapp