मुंबई : अनंत चतुर्दशीच्या मध्यरात्री प्रभादेवीत झालेल्या शिवसेनेतील राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तुल पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. प्रभादेवीमधील राड्यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सरवणकर, त्यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यासह ७ ते ८ जणांवर आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
अनंत चतुर्थदशीच्या मध्यरात्री प्रभादेवी स्टेशन परिसरात शिंदे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर हे दोन्ही गट दादर पोलिस स्टेशनबाहेर आमने – सामने आले होते. तेव्हा आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी केला. मात्र, सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
शिंदे गटातील संतोष तेलवणे आणि शिवसेनेचे शाखाप्रमुख महेश सावंत यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रभादेवी स्टेशन परिसरात स्टॉल लावला होता. त्यावरूनच वादाची ठिणगी पडली आणि राडा झाला. महेश सावंत यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष तेलवणे यांनी केला होता. आता याच प्रकरणात सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचं आरोप करण्यात आला आहे.
सदा सरवणकर यांच्याविरुद्ध कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल?
मुंबई पोलिसांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर, त्यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यासह ८ लोकांविरुद्ध गोळीबार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदा सरवणकर, समाधान सरवणकर यांच्यासह ७ ते ८ जणांविरुद्ध आर्म्स अॅक्टमधील ३/२५, १४२, १४३, १४४, १४६, १८६, ३३६ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा ३७ (१) या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT