अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत होणारी लक्षणीय वाढ पाहता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. अमरावतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी विकेंड लॉकडाउनची घोषणा केली असून दर आठवड्यातील शनिवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी आठपर्यंत बाजारपेठा व सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत वैद्यकीय व जिवनावश्यक सेवांचा अपवाद वगळता बाजार, दुकानं, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, चहा-नाश्त्याची हॉटेल, रेस्टॉरंट, बार, पानटपरी अशी सर्व दुकानं बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल दिले आहेत.
ADVERTISEMENT
दुध व भाजीपाल्याची दुकाने रविवारी सकाळी ६ ते १० या दरम्यान खुली राहतील. तसेच सर्व प्रकारच्या खासगी ट्रॅव्हल्स, बसेस, पालिकेची बससेवा, रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आपतकालीन परिस्थितीत रुग्णसेवेसाठी रिक्षा किंवा स्वतःचे वाहन वापरता येणार आहे. यासोबत जिल्हा प्रशासनाने जिमखाने, व्यायामशाळा, तलाव, थेटर, सलून, ग्रंथालय, आठवडी बाजार असे सर्व व्यवहार या कालावधीत बंद राहतील असं जाहीर केलंय.
अवश्य वाचा – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण
शहरात वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. अनावश्यक घराबाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशाराही अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी दिला आहे. संचारबंदीच्या काळात लोकांनी एकत्र जमू नये यासाठी पोलीस यंत्रणांनी आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT