मिथुन चक्रवर्ती यांनी नुकत्याच केलेल्या विधानाने पश्चिम बंगालच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप होऊ शकतो, असा दावा मिथून चक्रवर्तींनी दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर ममता बॅनर्जी यांचं सरकार संकटात असल्याची चर्चा सुरू झालीये.
ADVERTISEMENT
ममत बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाचे ३८ आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा मिथुन चक्रवर्ती यांनी केला आहे. त्यापैकी 21 आमदार असे आहेत जे थेट माझ्या संपर्कात असल्याते मिथुन चक्रवर्ती म्हणाले आहेत.
पश्चिम बंगालमध्येही महाराष्ट्रासारखं होऊ शकतं -मिथुन चक्रवर्ती
मिथुन चक्रवर्तींना याबाबत अधिक विचारले असता ते म्हणाले चित्रपटाच्या आधी संगीत आणि नंतर ट्रेलर रिलीज होतो. संगीत नुकतेच रिलीज झाले आहे. आता ट्रेलरची वाट पहा. मी मुंबईत झोपलो होतो. मला जाग आली आणि अचानक बातमी पाहिली, भाजप आणि शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आहे. हे काय झालं. हे बंगालमध्ये देखील होऊ शकते. बंगालमध्ये अशा गोष्टी होणार नाहीत असे मी म्हणत नाही, असे मिथुन चक्रवर्ती पत्रकार परिषदेत म्हणाले आहे. भाजपला मुस्लीमविरोधी म्हणणे हे केवळ एक षडयंत्र आहे, प्रत्यक्षात तसे काहीही नाही असेही चक्रवर्ती म्हणाले.
मिथुन चक्रवर्ती यांनी गेल्या वर्षीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. भाजपच्या मुस्लीमविरोधी प्रतिमेवर प्रश्न विचारला असता मिथुन म्हणाले की, भाजप दंगली घडवते असा नेहमीच आरोप केला जातो. पण मी स्पष्टपणे सांगतो की हा केवळ विरोधी पक्षांच्या कटाचा भाग आहे.
मिथून चक्रवर्तींनी दिलं सलमान, शाहरुख आणि आमिरचं उदाहरण
मिथुन पुढे म्हणाले की, भाजपला मुस्लिम विरोधी बोलले जाते. पण असे का होते? ते म्हणाले की, भारतातील तीन मोठे स्टार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान हे मुस्लिम आहेत. हे कसे शक्य झाले?
पुढे मिथुन म्हणाले, ’18 राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. जर भाजप त्यांचा तिरस्कार करत असेल आणि हिंदू त्यांच्यावर प्रेम करत नसतील, तर या तीन स्टार्सचे चित्रपट या राज्यांपेक्षा एवढे पैसे कसे कमवतात? मिथुन पुढे म्हणाले की, मी आता जिथे आहे तिथे पोहोचू शकलो कारण हिंदू, मुस्लिम, शीख सर्व माझ्यावर प्रेम करतात.
शिक्षक भरती घोटाळा २ हजार कोटींचा- मिथुन चक्रवर्ती
मिथुन चक्रवर्ती यांना बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या ईडीच्या कारवाईबद्दलही विचारले असता ते म्हणाले पुरावे नसतील तर घाबरण्यासारखे काही नाही. जर कोणी चूक केली असेल तर त्याला कोणतीही शक्ती वाचवू शकत नाही.
ईडीने ममता सरकारचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिच्या अटकेनंतर ते पकडले गेले. अर्पिता मुखर्जीच्या घरातून २० कोटींची रोकड सापडली आहे. हे पैसे शिक्षक घोटाळ्याशी संबंधित असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. पार्थ चॅटर्जी शिक्षणमंत्री असताना हा घोटाळा झाला होता. शिक्षक भरती घोटाळा १०० कोटींचा नसून २ हजार कोटींचा असल्याचा दावा मिथुन यांनी केला आहे.
भाजपकडे करण्यासारखे कोणतेही काम नाही- ममता बॅनर्जी
दरम्यान काही दिवसांपुर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला होता. भाजपकडे करण्यासारखे कोणतेही काम नाही. भाजपचे एकमेव काम आहे “तीन-चार एजन्सींद्वारे राज्य सरकारे ताब्यात घेणे”. असे ममत बॅनर्जी म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्र, झारखंडच्या सरकारांचा उल्लेख केला होता.
ADVERTISEMENT