महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. तरीही इतर आजार डोकं वर काढत आहेत. डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे दोन आजारही सध्या डोकं वर काढू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच टास्क फोर्सची एक बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या दोन आजारांबद्दल चिंता व्यक्त केली.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये डेंग्यूच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. जुलै महिन्यापर्यंत राज्यात 2169 रूग्ण आढळल्याची नोंद आहे. या वर्षातील ही तिसरी सर्वाधिक क्रमांकाची डेंग्यूची रूग्णसंख्या आहे. 2018 आणि 2019 मध्येही महाराष्ट्रात डेंग्यूचा कहर होता.
डेंग्यू म्हणजे काय?
डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून या तापाची लागण होते. हा एक विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती या डासामुळे हा रोग होतो. डेंग्यूलाच बोनब्रेक फिव्हर म्हणजेच हाडांमध्ये शिरणारा तापही म्हटलं जातं. कारण हा ताप आल्यानंतर अनेकांना हाडांच्या वेदनेचा आणि स्नायूंच्या वेदनांचा सामना करावा लागतो.
डेंग्यूमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार असतात. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावी ताप असं म्हणतात. दुसऱ्या तापामुळे जिवाचा धोकाही असतो. रूग्णाचा जीव दगावण्याचाही धोका या तापामुळे असतो.
डेंग्यूची प्रमुख लक्षणं काय आहेत ?
थंडी वाजून ताप येणं हे डेंग्यूचं प्रमुख लक्षण आहे. मात्र डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावी ताप या दोन प्रकारांची काही वेगवेगळी लक्षणं आढळू शकतात. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
अचानक ताप येणं, डोकं दुखणं, अंगदुखी, स्नायूंच्या वेदना, हाडांमध्ये वेदना होणं ही प्रमुख लक्षणं आहेत.
शरीरावर पुरळ येणं, नाकात पुरळ येणं अशीही लक्षणं दिसू शकतात. अशी लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण ही गंभीर तापाची लक्षणं असू शकतात.
Mumbai मधे Drone द्वारे जंतूनाशक फवारणी, डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढल्याने निर्णय
उपचार काय आणि काळजी कशी घ्यावी?
डेंग्यूवर उपचार करताना रूग्णाला काय लक्षणं दिसत आहेत त्याप्रमाणे औषधं दिली जातात.
ताप किंवा अंगदुखी किती प्रमाणात आहे? ते पाहून डॉक्टर औषधांचं प्रमाण ठरवतात
एखाद्या रूग्णाला जास्त प्रमाणात ताप आणि अंगदुखी असेल तर त्याला रूग्णालयातही दाखल करावं लागू शकतं
या आजारात पाळण्याचं पथ्य म्हणजे साधा आहार घेणं आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भरपूर पाणी पिणं.
रक्तस्त्रावी ताप हा डेंग्यूचा गंभीर प्रकार मानला जातो. साधारणतः तीन ते आठ दिवसांमध्ये हा ताप बरा होता. यापेक्षा जास्त ताप वाढला तर त्याचे गंभीर परिणाम होतात. डेंग्यू तापाचं या प्रकारात रूपांतर झाल्यास रूग्णाच्या लघवीद्वारे रक्तस्त्राव होतो. या सर्वांचा परिणाम मेंदू आणि किडनीसारख्या अवयवांवर होऊ शकतो.
डेंग्यूच्या आजारामध्ये येणाऱ्या तापामुळं शरिरातील प्लेटलेट्सचं प्रमाण हे कमी होत असतं. मात्र हे प्रमाण फार कमी होऊ नये यासाठी यावर लक्ष ठेवणं गरजेचं असतं.
साधारणपणे एक घन मिलीलीटर रक्तामध्ये 1.5 लाख ते 4.5 लाख प्लेटलेट्स एवढं प्रमाण असणं गरजेचं असतं. मात्र डेंग्यूमध्ये हे प्रमाण कमी होत असतं.
प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात आहे किंवा नाही, याची काळजी घेण्यासाठी वारंवार तपासणी करून खात्री करून घेणं गरजेचं असतं.
उपाय काय?
डेंग्यूचा संसर्ग पसरवणाऱ्या अळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातींचे डास तयार होऊ नये, यासाठी काळजी घेणंही गरजेचं आहे. त्यासाठी स्वच्छता असणं हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे.
डेंग्यूच्या अळ्या या स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात तयार होतात, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळं घरात एसी, फ्रीजखाली साचलेलं पाणी, फुलदाण्या, शोभेची झाडं याकडं विशेष लक्ष ठेवणं आणि त्याठिकाणी पाणी खूप दिवस जमा न होऊ देणं गरजेचं ठरतं.
ADVERTISEMENT