वाझेंची अटक आणि POLICE लिहिलेल्या Innova कारचा नेमका संबंध काय?

मुंबई तक

• 05:28 AM • 14 Mar 2021

मुंबई: अँटेलिया कार प्रकरणी API सचिन वाझेंना काल (13 मार्च) NIA कडून अटक करण्यात आली. त्यानंतर आज (14 मार्च) पहाटे साडे तीन वाजता एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार एनआयएच्या हाती लागली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची अटक आणि इनोव्हा कारचा नेमका संबंध काय? अशी चर्चा रंगू लागली आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: अँटेलिया कार प्रकरणी API सचिन वाझेंना काल (13 मार्च) NIA कडून अटक करण्यात आली. त्यानंतर आज (14 मार्च) पहाटे साडे तीन वाजता एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार एनआयएच्या हाती लागली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची अटक आणि इनोव्हा कारचा नेमका संबंध काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.

हे वाचलं का?

25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाच्या बाहेर एक स्कॉर्पिओ कार उभी करण्यात आली होती. ज्यामध्ये जिलेटीन कांड्या आणि अंबानींच्या नावे धमकीचं पत्र मिळालं होतं.

जेव्हा पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास केला तेव्हा त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्कॉर्पिओ कार पार्क केल्यानंतर त्या कारमधील संशयित व्यक्ती ही मागेच असणाऱ्या एका दुसऱ्या इनोव्हा कारमध्ये बसून निघून गेल्याचं पाहायला मिळालं होतं.

वाझेंच्या अटकेनंतर मोठी घडामोड, NIA ला सापडली पांढरी इनोव्हा कार!

त्यानंतर गेले अनेक दिवस पांढऱ्या इनोव्हा कारचा शोध पोलीस आणि एटीएसकडून सुरु होता. हीच कार मुलुंड टोल नाक्यावर देखील दिसली होती. मात्र, कालपर्यंत त्यांना ती कार काही सापडू शकली नव्हती. त्यामुळे ती पांढरी इनोव्हा आहे तरी कुठे? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता.

या सगळ्या दरम्यान, स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च 2021 रोजी मुंब्र्यातील खाडीत आढळून आला होता. त्यानंतर पहिल्यांदाच पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यांना या प्रकरणी अटक करण्यात यावी अशी मागणी देखील विरोधकांनी केली होती.

दुसरीकडे गाडीत सापडलेल्या जिलेटीन कांड्यांचा तपास हा एनआयए करत होती. काल त्यांनी तब्बल 13 तास कसून चौकशी केल्यानंतर वाझेंना अटक केली. दुसरीकडे त्यांच्या अटकेनंतर आज पहाटे साडेतीनच्या सुमारास एक इनोव्हा कार देखील एनआयएच्या कार्यालयात टोईंग करुन आणण्यात आली.

Exclusive: हीच ती पांढरी इनोव्हा जिचा शोध घेत आहे NIA

MH-01-ZA-403 या क्रमांकाची गाडी टोईंग करुन एनआयएच्या मुंबईतील कार्यालयात आणली गेली. जेव्हा गाडी कार्यालयाच्या आवारात आली तेव्हा एनआयएचे अनेक अधिकारी हे तात्काळ या कारपाशी जमा झाले.

त्यानंतर त्यांनी या कारची अतिशय लक्षपूर्वक पाहणी केली. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या कारच्या मागे इंग्रजीत POLICE असं लिहण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसतं आहे.

त्यामुळे अँटेलियाबाहेर जी इनोव्हा कार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली होती ती कार हीच तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, अद्याप तरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती एनआयएकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे जेव्हा अधिकृत माहिती समोर येईल तेव्हाच या पांढऱ्या इनोव्हा कारबाबतचा उलगडा होऊ शकणार आहे.

    follow whatsapp