मुंबई: भाजप नेत्यांवर शिवसेनेला हव्या त्या पद्धतीने कारवाया होत नसल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गृहमंत्री पदावरुन बिनसलं असल्याची चर्चा आहे. या सगळ्यातच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेला संजय राऊत देखील हजर होते. यावेळी या बैठकीत नेमकं काय घडलं या बैठकीतील Inside Story आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांच्यात काही तरी बिनसलं असल्याची जी चर्चा आहे सुरु त्यावर पडदा टाकणं हेच सरकारसाठी आवश्यक आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संजय राऊत यांची जी बैठक होती ती बैठक संपलेली आहे. दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की, अशा पद्धतीच्या सरसकट कारवाया आम्ही करु शकत नाही. पोलीस खात्याला काही बंधनं आहेत. कायद्याचे काही बंधन आहेत. त्यामुळे अशाप्रकारची सरसकट कारवाई होऊ शकत नाही.
तूर्तास तरी गृह खात्याच्या बाबतीतला वाद हा मुख्यमंत्र्यांनी स्वत: अधिकृतरित्या प्रेस रिलीज काढून संपविण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या वेळेस हे प्रेस रिलीज निघालं तेव्हा दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या समोर बसले होते आणि तातडीने ते प्रेस रिलीज काढण्यात आलं. त्यामुळे सध्या तरी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्र्यांकडून देखील होत आहे.
वळसे पाटील यांच्यावर मुख्यमंत्री नाराज असं वृत्त समोर आल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पाहा नेमकं काय म्हटलं आहे.
CMO – गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे
अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
‘माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास’, गृहमंत्र्यांबाबतच्या ‘त्या’ चर्चेवर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, कालच (31 मार्च) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. याच बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांवर काँग्रेसच्या मंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवल्याची जोरदार चर्चा होती.
याशिवाय अधिवेशनात देखील विरोधकांना उत्तर देताना गृहमंत्री नरमाईचं धोरण घेत असल्याची देखील त्यांच्यावर टीका झाली होती. याच सगळ्यातून मुख्यमंत्री हे गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चेने जोर धरला. मात्र, आता याबाबत स्वत: मुख्यमंत्री ठाकरेंनी यावर स्पष्टीकरण देत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT