किरण माने प्रकरण नेमकं आहे काय? आत्तापर्यंत काय काय घडलं?

मुंबई तक

• 08:06 AM • 17 Jan 2022

किरण मानेंना मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकल्याचा विषय गेल्या तीन दिवसांपासून गाजतो आहे. आपण राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला काढून टाकण्यात आलं असा आरोप अभिनेते किरण माने यांनी केला. त्यानंतर बहुजनांवर सीरियल आणि सिनेमा इंडस्ट्रीत कायम अन्यायच होत आला आहे अशी भूमिकाही त्यांनी मांडली. महिला कलाकारांशी गैरवर्तणूक केल्यामुळे काढून टाकण्यात आल्याचं चॅनलचं स्पष्टीकरण आल्यानंतरही […]

Mumbaitak
follow google news

किरण मानेंना मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकल्याचा विषय गेल्या तीन दिवसांपासून गाजतो आहे. आपण राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला काढून टाकण्यात आलं असा आरोप अभिनेते किरण माने यांनी केला. त्यानंतर बहुजनांवर सीरियल आणि सिनेमा इंडस्ट्रीत कायम अन्यायच होत आला आहे अशी भूमिकाही त्यांनी मांडली. महिला कलाकारांशी गैरवर्तणूक केल्यामुळे काढून टाकण्यात आल्याचं चॅनलचं स्पष्टीकरण आल्यानंतरही किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहून हे होणारच होतं. गैरवर्तणुकीच्या आरोपांमध्ये काही दम नाही असं म्हटलं आहे. आपण जाणून घेऊन नेमकं या प्रकरणात काय काय घडलं आहे?

हे वाचलं का?

माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जातं आहे, वेळ आल्यावर मी पण पुरावे बाहेर काढेन-किरण माने

13 जानेवारीला रात्री 8 च्या दरम्यान किरण मानेंनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. काट लो जुबान, आंसुओंसे गाऊंगा… गाड दो, बीज हूँ मै.. पेड बन ही जाऊंगा! अशी ही पोस्ट होती. यानंतर किरण माने यांना मुलगी झाली हो मालिकेतून काढून टाकण्यात आल्याची बातमी समजली. आपण गेल्या आठ दिवसांपासून राजकीय पोस्ट लिहून टीका करत असल्याने आणि त्या भाजपच्या विरोधात असल्याने आपल्याला या मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे असा आरोप किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून केला. तुम्ही राजकीय भूमिका घेतल्याने, पोस्ट लिहिल्याने तुम्हाला काढून टाकलं हे तुम्हाला चॅनलनं सांगितलं आहे का? यावर किरण मानेंनी अद्याप काहीही उत्तर दिलेलं नाही.

किरण मानेंना ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून वगळलं, सरपंच युवतीने मालिकेला दाखवला बाहेरचा रस्ता!

चॅनलने काय म्हटलं आहे?

स्टार प्रवाह वाहिनीने किरण माने प्रकरणी लेखी स्पष्टीकरण दिलं आहे. राजकीय भूमिका मांडत असल्याच्या कारणानं नाही तर अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला कलाकारांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. तसेच किरण माने यांनी केलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

किरण मानेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर काय म्हटलं?

‘देशात सांस्कृतिक क्षेत्र फार महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादा कलाकार एखादं भाष्य करतो तेव्हा ते फार लवकर समाजाता पोहचतं. सांस्कृतिक क्षेत्राने समाजात क्रांती घडवण्याचं काम केलं आहे. मुनव्वर फारुखीसारख्या कॉमेडियनचे प्रयोग बंद पाडले जातात कारण तो परखड भाष्य करतो. कुणाल कामरा जे बोलतो त्यावरून त्याला ट्रोल केलं जातं. अनेकांना त्याची भीती वाटते. कारण सांस्कृतिक क्षेत्रातून तुम्ही कोणतीही गोष्ट पटकन पोहचवू शकता. समाज भान असलेला नट फार गरजेचा असतो समाजासाठी. ऑक्सिजनसारखा असतो. तुमच्या जगण्यातल्या बऱ्याच गोष्टी तो मांडत असतो.’ ‘मनोज कुमारचे सिनेमा येत होते तेव्हा महंगाई मार गयी सारखी गाणी यायची तेव्हा कुणी म्हणायचं नाही की सत्ताधाऱ्यांवर टीका केली. बेरोजगारीवर भाष्य करणारं तेरी दो टकिये की नोकरीमें मेरा लाखो का सावन जाए सारखं गाणं आलं होतं तेव्हाही कुणी त्यावर टीका केली नाही. मनोज कुमार भाजपचे होते. ते काँग्रेसच्या सरकारवर टीका करायचे. मात्र तेव्हा असं काहीही घडलं नाही दहशतवाद वगैरे. आता हे प्रमाण वाढलं आहे.’

‘आज शरद पवारांची मी भेट घेतली याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सांस्कृतिक क्षेत्राची इथ्यंभूत माहिती असणारे नेते म्हणजे शरद पवार. मी आज त्यांना भेटलो. त्यांना मी माझी बाजू सांगितली. मी माझी बाजू आज त्यांना सांगितली. मला चॅनलमधून कारण उशिरा सांगण्यात आलं. की ज्या सीरियलसाठी मी खूप योगदान दिलं त्या सीरियलमधून अशा पद्धतीने मला काढू नये. मला असं काढून टाकणं हे मला हे मला झुंडशाहीसारखं वाटतं.

किरण मानेंबाबत मालिकेतील स्त्री कलाकारांनी काय म्हटलं आहे?

मुलगी झाली हो’ या मालिकेत साजिरी पाटील म्हणजेच ‘माऊ’ची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगांवकर हिने याप्रकरणी तिचे मत व्यक्त केले आहे. ‘किरण माने आणि माझे बोलणंच व्हायचे नाही. जेव्हा मी सुरुवातीला या सिरीअलच्या सेटवर आले तेव्हा त्यांनी मला सांगितले की मी तुझ्या वडिलांचा रोल प्ले करणार आहे. तर आपण सेटवरही असेच राहूया. मला तुझ्यात माझी मुलगी दिसते. सुरुवातीचे महिने फार उत्तम गेले.’ असे ती म्हणाली.

‘त्यानंतर मला ते विविध गोष्टींवर टोमणे मारायचे. माझ्या वजनावरुन ते मला बोलायचे. त्यानंतर त्यांनी बरेच अपशब्द उच्चारले. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्हाला माझ्यात तुमची मुलगी दिसते, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बापाने सांगावं की कोणता बाप आपल्या लेकीसाठी असे अपशब्द उच्चारेल? मला या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून हवे. मालिकेचे शूटींग थांबणार नाही. त्यांना गैरवर्तवणुकीमुळे काढण्यात आले आहे. गेले वर्षभर त्यांना याबद्दल समज देत आहेत’असेही दिव्या म्हणाली.

सविता मालपेकरांनी काय म्हटलं आहे?

राजकारणात असलेले अनेक कलाकार आहेत. ते विशिष्ट राजकीय भूमिका घेतात म्हणून त्यांना काढून टाकलं जात नाही. आदेश बांदेकर हेदेखील राजकारणात आहेत. अमोल कोल्हे हेदेखील राजकारणात आहेत. तेदेखील राजकीय भूमिका मांडत असतात पण म्हणून त्यांना काढून टाकलं जात नाही.

काय म्हटलं आहे शर्वाणी पिल्ले यांनी?

किरण माने यांची वर्तणूक चांगली नव्हती. ते सतत टोमणे मारतात. मी आणि दिव्या तर त्यांच्याशी बोलतही नव्हतो. फक्त कामापुरते बोलत होतो. तरीही किरण माने आमच्याबाबत अपशब्द वापरत बोलत होते. त्यांचं हे वर्तन चांगलं नाही. दिव्याने तर मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. नोव्हेंबर महिन्यात त्यांना वॉर्निंग देण्यात आली होती. त्यानंतरही त्यांचं वर्तन सुधारलं नाही. आत्ता त्यांनी राजकीय भूमिका घेतल्याने मला काढून टाकलं असं पांघरूण घेतलं आहे. मात्र हे पांघरूण कधीतरी निघणार आहे. सत्य काय ते आम्हाला ठाऊक आहे असंही शर्वाणी पिल्ले यांनी म्हटलं आहे.

या सगळ्यानंतर पुन्हा एकदा किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहून हे सगळं होणारच होतं असं म्हटलं आहे..

महिलांशी गैरवर्तन असे आरोप माझ्यावर लावण्यात आले आहेत. मला काढून टाकल्यानंतर विशिष्ट काळ गेल्यानंतर हे कारण देण्यात आलं आहे. जे कलाकार माझ्याविरोधात बोलत आहेत ते पोटार्थी आहेत. त्यांनाही ही भीती वाटते आहे की त्यांनी सीरियलमधून काढून टाकलं जाईल. त्यामुळे ते तसं बोलत आहेत. महिलांशी गैरवर्तन करत होतो तर मग आधी मला का काढून टाकण्यात आलं नाही? आता जे काही स्पष्टीकरण दिलं जातं आहे ते सगळं राजकीय झुंडशाही झाकण्यासाठी आहे. या आशयाची एक भलीमोठी फेसबुक पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे आणि हे सगळं घडणारच होतं असं म्हटलं आहे.

मनसेच्या अमेय खोपकरांची भूमिका काय?

किरण माने स्वतला नाहक मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने कलाकारांशी गैरवर्तणूक केली आहे आणि आम्ही त्या कलाकारांच्या पाठीशी आहोत.. नाहक उगाचच खोटं बोलून विषय भलतीकडेच किरण मानेंनी घेऊन जाऊ नये.. किरण मानेंविषयी प्रतिक्रिया द्यायला तो काही इतका मोठा नाही. मनसे किरण मानेंच्या विरोधात आहे.. आणि वेळ येईल तेव्हा मनसे चित्रपट सेनेचा अध्यक्ष म्हणून मी माध्यमांशी जरूर बोलेन. आत्ता त्या किरण मानेंबद्दल बोलून त्याला नाहक मोठं करण्याची मला आवश्यकता वाटत नाही.

आदेश बांदेकर यांनी काय म्हटलं आहे?

‘मी नेहमीच राजकारण आणि कलाक्षेत्र हे वेगळं ठेवतो. जेव्हा समाजकारण करायचं असतं तेव्हा समाजकारण करतो. जेव्हा कलाक्षेत्रात वावरतो तेव्हा कलाकार म्हणून काम करतो.. किरण माने या कलाकाराला राजकीय पोस्ट करतो म्हणून काढून टाकतो असं माझ्या ऐकण्यात नाही. किरण मानेच काय पण कोणत्याही कलाकाराला मालिकेतून या कारणामुळे काढून टाकलं आहे असं कधीच माझ्या निदर्शनास आलेलं नाही.

किरण माने यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्यापासून हे सगळं प्रकरण गाजतं आहे. किरण माने यांच्यावर त्यांच्याच मालिकेतील सहकलाकारांनी आरोप केले आहेत. मात्र किरण माने हे सगळं मान्य करायला तयार नाहीत. राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून आपल्याला काढून टाकण्यात आलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच बहुजनांवर कायमच अन्याय होतो अशीही भूमिका त्यांनी घेतली आहे. आता हे सगळं प्रकरण नेमकं कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp