कोरोनाच्या साथीनंतर आता मंकीपॉक्सने चिंता वाढवलीये. जगभरात रुग्ण आढळून येत असलेल्या मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग झालेला आणखी एक रुग्ण देशात आढळून आला आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ४ वर पोहोचली असून, या रुग्णाने परदेशात प्रवास केलेला नाही. यापूर्वी आढळून आलेले तिन्ही रुग्ण युएईमधून परतले होते.
ADVERTISEMENT
दिल्लीत मंकीपॉक्सच्या पहिल्या रुग्णाची नोंद
राजधानी दिल्लीत मंकीपॉक्स विषाणूनं धडक दिलीये. मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णाला दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने याला दुजोरा दिला असून, मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णाचं वय ३१ वर्ष आहे. या रुग्णाने परदेश प्रवास केल्याची पार्श्वभूमी नाही. रुग्णाला प्रचंड ताप भरला आणि त्वचेवर जखमा दिसून आल्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आलं.
मंकीपॉक्स आजार काय आहे?
अमेरिकच्या सेंटर फॉर डिझीज कंट्रोल म्हणजे साथरोग नियंत्रण केंद्राच्या माहितीनुसार मंकीपॉक्स हा आजार पहिल्यांदा १९५८ मध्ये आढळून आला. त्यावेळी संशोधनासाठी ठेवण्यात आलेल्या वानरांमध्ये हा आजार आढळून आला होता. त्यामुळे या आजाराचं नाव मंकीपॉक्स असं ठेवण्यात आलं.
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीप्रमाणे मंकीपॉक्स आजाराचा पहिला रुग्ण १९७० मध्ये आढळून आला. तेव्हा काँगोमधील एका ९ वर्षाच्या मुलाला मंकीपॉक्स आजाराची लक्षणं आढळून आली होती. १९७० नंतर ११ आफ्रिकी देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले होते.
मंकीपॉक्सचा विषाणू जगभरात आफ्रिकेतूनच पसरला. २००३ मध्ये अमेरिकेत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले होते. सप्टेंबर २०१८ मध्ये इस्रायल आणि ब्रिटेनमध्येही मंकीपॉक्स आजाराचे रुग्ण आढळून आले होते. मे २०१९ मध्ये नायजेरियातून सिंगापूरमध्ये परतलेल्या नागरिकांना मंकीपॉक्सचा संसर्ग झाला होता.
इग्लंडमधील वृत्तसंस्था युके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्स हा संसर्गजन्य विषाणू आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला या आजाराचा संसर्ग होऊ लागला आहे.
मंकीपॉक्सची लक्षणं काय आहेत?
मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर लक्षणं दिसण्याचा कालावधी ६ ते १३ दिवसांचा असतो. काही वेळा तो ५ ते २१ दिवसांपर्यंतही असू शकतो. म्हणजेच मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्या व्यक्तीला या आजाराची लक्षणं ६ ते १३ दिवसांनंतर दिसू लागतात.
संक्रमित झाल्यानंतर सहा दिवसांत ताप, प्रचंड डोकेदुखी, सूज येणे, पाठ दुखणे, शरीरातील शिरा दुखणे आणि अशक्तपणा अशी लक्षणं दिसायला लागतात. मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्यानंतर चिकनपॉक्स म्हणजे कांजण्यासारखा दिसतो.
ताप येऊ लागल्यानंतर एक ते तीन दिवसांत याचा त्वचेवर परिणाम दिसायला लागतात. शरीरावर छोटे फोड येतात. हे फोड हातपाय, तळहात आणि चेहऱ्यावरही दिसू लागतात. त्यानंतर ते शुष्क होऊन गळून पडतात.
शरीरावर उठणाऱ्या या फोडांचं प्रमाण तुरळक किंवा अतिदाट असू शकतं. संक्रमण गंभीर असेल, तर फोड बरे होण्यास बराच अवधी लागू शकतो.
ADVERTISEMENT