शिवसेनेच्या दृष्टीने आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. दसरा मेळावा आणि शिवसेना यांच्यातलं नातं काही वेगळंच आहे. कारण शिवसेनेने ही परंपरा गेल्या ५६ वर्षांपासून सुरू ठेवली आहे. शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ ला शिवतीर्थावर पार पडला होता. मात्र मागच्या ५६ वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. आज शिवसेना एकसंध नाही तर दुभंगलेली आहे. शिवसेनेचं चिन्ह गोठणार का? अशाही चर्चा सुरू आहेत. आपण शिवसेनेविषयी आणि हा धनुष्यबाण शिवसेनेला कधी मिळाला त्याविषयी जाणून घेणार आहोत.
ADVERTISEMENT
२१ जून २०२२ ला शिवसेनेत उभी फूट
२१ जूनल २०२२ ला शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारालं आणि ४० आमदारांना सोबत घेऊन ते गुवाहाटीला गेले होते. शिवसेनेचं पक्ष नेतृत्व म्हणजेच उद्धव ठाकरे यांनाच त्यांनी थेट आव्हान दिलं. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेत नाहीत हा ठपका एकनाथ शिंदे यांनी ठेवला. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. महाविकास आघाडीचं सरकार राज्यावर होतं जे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे पडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. आता शिंदे फडणवीस सरकार आलेलं असताना शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर तर एकनाथ शिंदेंचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडणार आहेत.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे… धनुष्यबाण चिन्हाशिवाय निवडणूक झाल्यास फायदा कोणाला?
धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे विरूद्ध शिंदे असा सामना
धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच राहणार की एकनाथ शिंदेंना मिळणार की गोठवलं जाणार ? या तीनपैकी एक निर्णय अद्याप व्हायचा आहे. मात्र हा धनुष्यबाण शिवसेनेकडे सुरूवातीपासून नव्हता ही बाबही महत्त्वाची आहे. शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली. मुंबईत होणारा मराठी माणसावरचा अन्याय आणि अत्याचार या विरोधात आवाज उठवणारी संघटना म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनेचा वाघ हा शिवसेनेसोबत होताच. मात्र शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह सुरूवातीपासून शिवसेनेसोबत नव्हतं.
१९६८ मध्ये शिवसेनेची प्रजासमाजवादी पक्षासोबत युती
१९६८ मध्ये जेव्हा शिवसेना आणि प्रजा समाजवादी पक्ष यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी युती झाली तेव्हा झाली तेव्हा १४० जणांच्या सभागृहात शिवसेनेने ४२ जागा जिंकल्या. प्रजासमाजवादी पक्षासोबत मुंबई महापालिकेच्या निवडणुकासाठी केलेली ही युती दोन वर्षे टिकली. त्यानंतर १९७२ मध्ये शिवसेनेने रा.सु. गवई गट आणि मुस्लीम लिग यांच्याशी युती केली. ही युतीही महापालिका निवडणुकीपुरतीच होती. १९७६ ते १९७८ या कालावधीत काँग्रेस आणि शिवसेनेची महापालिकेत युती होती.
१९८० मध्ये शिवसेनेने काँग्रेसची साथ सोडली
१९८० मध्ये शिवसेनेने काँग्रेसची साथ महापालिकेत सोडली. मात्र तोपर्यंत शिवसेनेने रेल्वे इंजिन, कप बशी, ढाल तलवार अशा विविध चिन्हांवर निवडणुका लढवल्या होत्या. आता प्रश्न उरतो तो धनुष्यबाण शिवसेनेला कधी मिळाला तो?
धनुष्यबाण शिवसेनेला कधी मिळाला?
धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला १९८९ मध्ये मिळालं. शिवसेनेची पक्ष म्हणून नोंद केल्यानंतर हे चिन्ह शिवसेनेला मिळालं. आता या चिन्हाचं नेमकं काय होणार? हा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण हा उद्धव ठाकरेंकडेच राहिला तर उद्धव ठाकरेंसाठी तो मोठा दिलासा असणार आहे. तसंच शिंदे गटासाठी तो मोठा धक्का असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे जर धनुष्यबाण गेला तर तो उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका असणार आहे. तर चिन्ह गोठवलं गेलं तरीही उद्धव ठाकरेंसाठी तो धक्का मानला जातो आहे. अशात नवं चिन्ह निवडावं लागू शकतं. तूर्तास तरी अशी वेळ आलेली नाही. मात्र काय काय घडणार आणि दसरा मेळाव्यात काय घोषणा होतील तसंच उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे हा सामना कसा रंगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT