मुंबई: देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारच्या मालकाचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घातापताचा संशय व्यक्त केला आहे. तसेच पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविषयी देखील या प्रकरणावरुन त्यांनी काही खळबळजनक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा सचिन वाझे यांचं नाव चर्चेत आलं आहे.
ADVERTISEMENT
सचिन वाझे हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने एक वादग्रस्त पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. आतापर्यंत बऱ्याच प्रकरणावरुन त्यांच्यावर टीका झाली आहे. अशावेळी आता पुन्हा एकदा सचिन वाझे यांचं नाव थेट विरोधी पक्ष नेत्यांकडून समोर आलं आहे. त्यामुळे वाझेंविषयी पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. जाणून घ्या सचिन वाझेंविषयी नेमकी माहिती.
सचिन वाझे नेमके आहेत तरी कोण?
सचिन हिंदुराव वाझे हे मूळचे कोल्हापूरचे असून त्यांचा जन्म 22 फेब्रवारी 1972 रोजी झाला. 1990 साली ते पोलीस दलात सामील झाले होते. सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात झाली होती. मात्र दोन वर्षातच म्हणजे 1992 साली त्यांची बदली थेट ठाण्यासारख्या शहरी भागात करण्यात आली होती. ठाण्यात बदली होऊन आल्यानंतर त्यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केली त्यामुळे ते नेहमीच चर्चेत होते. दरम्यान, एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि दया नायक यांच्या टीममध्ये सचिन वाझे यांचा समावेश करण्यात आला होता.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझेंची पहिली प्रतिक्रिया..
आपल्या 30 वर्षाच्या कार्यकाळात सचिन वाझे यांनी 63 गुन्हेगारांचं एन्काउंटर केलं आहे. त्यामुळे एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी त्यांची पोलीस दलात ओळख निर्माण झाली होती. मुन्ना नेपाळी या कुप्रसिद्ध गुंडाचा खात्मा सचिन वाझे यांनीच केला होता. तेव्हापासून सचिन वाझे हे खूपच चर्चेत आले होते.
सचिन वाझेंना ख्वाजा युनूस प्रकरण चांगलंच भोवलं होतं!
2 डिसेंबर 2002 रोजी मुंबईतील घाटकोपरमध्ये एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला होता. तर 39 जण जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी 8 लोकांना अटक केली होती. यापैकी एका आरोपीचं नाव होतं ख्वाजा युनूस. तो मूळचा परभणीतील होता. 25 डिसेंबर 2002 साली त्याला प्रिवेंशन ऑफ टेरेरिज्म अॅक्ट म्हणजेच POTA च्या अंतर्गत त्याला अटक करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर असा आरोप केला होता की, घाटकोपर बॉम्बस्फोटात त्याचा सक्रीय सहभाग होता.
दरम्यान, 6 जानेवारी 2003 मध्ये घाटकोपर पोलीस ठाण्यात युनूस आणि इतर तीन आरोपींची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर 7 जानेवारीला पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की, युनूस बेपत्ता झाला आहे. युनूसला चौकशी संदर्भात औरंगाबादला घेऊन जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्याचाच फायदा घेऊन तो आमच्या ताब्यातून पळून गेला. अशी माहिती पोलिसांनी दिली होती. पण युनूसच्या सोबत असणाऱ्या इतर आरोपींनी कोर्टात असं म्हटलं की, ‘युनूसला पोलीस कस्टडीत बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याच्या तोंडातून प्रचंड रक्त वाहत होतं आणि त्यानंतर तो आम्हाला काही दिसला नाही.’
सचिन वाझेंवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानसभेत खडाजंगी
याचप्रकरणी युनूसच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सीआयडीकडे सोपवला होता. यावेळी चौकशीत असं समोर आलं होतं की, पोलिसांच्या ताब्यात असतानाच युनूसचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सचिन वाझे आणि तीन इतर पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर हत्या आणि पुरावे लपविण्याचा आरोप करण्यात आला होता. 2004 साली सचिन वाझे यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आलं होतं. दुसरीकडे 2007 साली वाझेंनी आपल्या पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देखील दिला होता. मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. या सगळ्या काळात युनूस प्रकरणी केस कोर्टात सुरुच होती. मात्र, 2018 नंतर कोणतीही सुनावणी झाली नाही.
सचिन वाझेंनी शिवसेनेत केला होता प्रवेश!
दरम्यान, 2007 साली त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर 2008 साली दसरा मेळाव्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश देखील केला होता. पण ते पक्षात मात्र फारसे सक्रीय दिसले नाही. निलंबित होण्याआधी सचिन वाझे हे एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या टीममध्येच होते.
दुसरीकडे घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी युनूस याच्याशिवाय सातही आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली होती. तर 2020 साली सचिन वाझे यांच्यासह राजेंद्र तिवारी आणि सुनील देसाई हे देखील पुन्हा पोलीस दलात रुजू झाले होते.
दरम्यान, 2020 मध्ये पुन्हा पोलीस दलात दाखल झाल्यानंतर वाझे हे तात्काळ अॅक्शन मोडमध्ये दिसून आले होते. रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक करण्यासाठी सचिन वाझे आणि त्यांची टीमच गेली होती. यावरुन अर्णब गोस्वामी यांनी सचिन वाझेंसारखा एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी मला अटक करण्यासाठी का पाठवला आहे? असा सवाल देखील केला होता.
अँटेलिया कार आणि मनसुख हिरेन: वाझेंच्या कारकीर्दीतील आणखी एक वादग्रस्त प्रकरण
सचिन वाझे यांच्या कारकीर्दीतील अँटेलिया कार पार्किंग आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकर हे सर्वात वादग्रस्त प्रकरण ठरलं आहे. अँटेलिया येथील स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्याप्रकरणी एनआयएकडून वाझेंना अटक करण्यात आली. तर दुसरीकडे मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी देखील त्यांच्यावर हत्येचा आरोप वाझेंवर करण्यात आला आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण वाझेंच्या कारकीर्दीला वळण देणारं ठरु शकतं.
टेक्नो सॅव्ही अधिकारी अशी वाझेंची ओळख
पोलीस दलातील टेक्नो सॅव्ही अधिकारी अशीही सचिन वाझे यांची ओळख आहे. एवढंच नव्हे तर ते स्वत: एक सॉफ्टवेअर डेव्हलपर असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे सायबर क्राइम आणि नकली नोटांसंबधी देखील अनेक प्रकरणात त्यांनी तपास अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
एक पोलीस अधिकारी एवढीच सचिन वाझेंची ओळख नाही. तर एक लेखक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. ‘जिंकून हरलेली लढाई’, द स्कॉट, शीना बोरा: द मर्डर दँट शुक इंडिया, यासह बरीच पुस्तकं त्यांनी लिहली आहे. याशिवाय त्यांनी काही मासिकांसाठी देखील लेखन केलं आहे.
दरम्यान, 16 वर्ष पोलीस दलापासून दूर राहिलेल्या सचिन वाझे हे 9 जून 2020 रोजी पुन्हा एकदा पोलीस दलात दाखल झाले आहेत.
ADVERTISEMENT