मनिष जोग, प्रतिनिधी, जळगाव
महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सुषमा अंधारे जळगावात आहेत. मुक्ताई नगरमध्ये आज संध्याकाळी ६ वाजता सुषमा अंधारे यांची सभा होणार होती. मात्र प्रशासनाने सभेची परवानगी नाकारली आहे. मुक्ताई नगर या ठिकाणचं स्टेजही काढून टाकण्यात आलं. त्यानंतरही सुषमा अंधारे यांनी मुक्ताई नगरला जाणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. त्या के.पी. प्राईड या हॉटेलमधून निघाल्या असताना त्यांना पोलिसांनी अडवलं आहे. त्यामुळे जळगावात अभूतपूर्व असा गोंधळ पाहण्यास मिळतो आहे.
ADVERTISEMENT
सुषमा अंधारे यांनी काय म्हटलं आहे?
मला पोलिसांनी सभा स्थळी जाण्यापासून इथे हॉटेलच्या खाली आल्यावरच अडवलं आहे. मी आत्ता कारमध्ये बसून राहिले आहे. माझ्यासमोर किमान पाचशे पोलिसांचा फौजफाटा आहे. मला का थांबवण्यात येतं आहे? हे अजून समजलेलं नाही. सभा घेणं हा माझा अधिकार आहे मी काही दहशतवादी आहे का? की मला अशा प्रकारे अडवलं जातं आहे? गुलाबराव पाटील हे सत्ता असल्याने अशा प्रकारे अडवणूक आणि दडपशाही करत आहेत हे सहन केलं जाणार नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
यावेळी सुषमा अंधारे यांच्यासोबत आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धवसाहेब अंगार है बाकी सब भंगार है अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. तसंच सुषमा अंधारे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशाही घोषणा दिल्या गेल्या. सुषमा अंधारे यांच्या दोन दिवसात जळगावमध्ये ज्या सभा झाल्या त्या पाहून आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून मिंधे गटाच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळेच ही दडपशाही केली जाते आहे असं सुषमा अंधारे यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलं आहे?
हा लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. या देशात जो कुणी आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातो आहे. आधी किशोरी पेडणेकर यांना त्रास दिला गेला आता सुषमा ताई अंधारे यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आहे. ही दडपशाही महाराष्ट्रात लोकांना दिसून येते आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT