काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी कोणाचा विरोध करण्यासाठी नाही, तर पक्ष मजबूत करण्यासाठी मैदानात उतरलो आहे. खर्गे म्हणाले की, महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य दिले तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी देश एक ठेवून जय जवान जय किसानचा नारा देत देशाला बळकट केले. राज्याचे रक्षण केले. या दोघांना अभिवादन करून मी निवडणूक प्रचाराची सुरुवात करत आहे.
ADVERTISEMENT
शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात लढत
३० सप्टेंबर हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकनाचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात लढत आहे. तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 8 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होईल आणि १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल.
तत्व आणि विचारधारेसाठी मी लहानपणापासूनच लढलो: खर्गे
‘एक व्यक्ती, एक पद’ या सूत्रानुसार मी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचे खरगे यांनी सांगितले. माझ्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला माहिती आहे. मी लहानपणापासून आजपर्यंत तत्व आणि विचारधारेसाठी लढत आलो आहे. माझ्या आयुष्यात लहानपणापासून संघर्ष आहे. अनेक वर्ष मंत्री होतो आणि विरोधी पक्षनेताही. सदनात भाजप आणि संघाच्या विचारसरणीविरोधात लढत राहिलो. मला पुन्हा लढायचे आहे आणि लढून मी तत्त्वे पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे, असं ते म्हणाले.
‘पक्षासाठी पूर्णवेळ काम करावं लागतं ‘ : खर्गे
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पक्षात काम करणं हे पूर्णवेळ काम आहे. मी संसदेत जायचो तेव्हा संध्याकाळीच बाहेर निघायचो. मला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. देशातील ज्वलंत समस्या, बेरोजगारी, महागाई या ज्वलंत समस्यांशी जनता झगडत आहे. श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब अधिक गरीब होत चालला आहे. या सर्व बाबी पाहता भाजपने विशेषत: या 8 वर्षात दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असं खर्गेंचं म्हणणं आहे.
‘निवडणूक लढण्यासाठी जनतेने पाठिंबा दिला’
ते म्हणाले, माझ्या सहकाऱ्यांनी सांगितले की, मी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवावी, त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून मी समोर आलो. त्यांनी मला ऊर्जा आणि प्रेरणा दिली आहे. काहींनी घरी भेट घेतली, काहींनी दूरध्वनी करून पाठिंबा दिला. कारण ते म्हणाले की, राहुल गांधींना निवडणूक लढवायची नाही आणि काँग्रेस अध्यक्ष व्हायचे नाही आणि सोनिया गांधींनाही अध्यक्ष व्हायचे नाही. प्रियांका गांधींना निवडणूक लढवायची नाही, म्हणून मी निवडणूक लढवत आहे, असं खर्गे म्हणाले.
ADVERTISEMENT